मेलबर्न : २०२१ साली भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि आणखी एका देशात सुपर सीरिज खेळवली जाईल, अशी घोषणा बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने केली आहे. सौरव गांगुलीची ही कल्पना नाविन्यपूर्ण असल्याचं मत क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केव्हिन रॉबर्ट्स यांनी मांडलं आहे. एकीकडे ऑस्ट्रेलियाकडून गांगुलीचं कौतुक झालेलं असतानाच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू राशिद लतीफने ही कल्पना बकवास असल्याचं म्हणलं आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आधीच या स्पर्धेला पाठिंबा जाहीर केला आहे. आता क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही या स्पर्धेबाबत सकारात्मक वक्तव्य केलं आहे. पुढच्या महिन्यात भारत आणि बांगलादेश दौऱ्यात या स्पर्धेबाबत विस्तृत चर्चा होईल, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितलं आहे.
चार देशांच्या सुपर सीरिजचा विचार नाविन्यपूर्ण आहे. बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून सौरव गांगुलीचा विचार सकारात्मक आहे. एवढ्या कमी वेळेत गांगुलीने अनेक नवीन गोष्टी केल्या आहेत. भारताने आपली पहिली डे-नाईट टेस्ट खेळली आणि आता गांगुली सुपर सीरिजची कल्पना घेऊन आला आहे, असं रॉबर्ट्स म्हणाले.
बिग थ्री मॉडेल प्रमाणेच गांगुलीचा हा विचारही अयशस्वी होईल, अशी टीका राशिद लतीफने केली होती. ४ देश या स्पर्धेत खेळून इतर टीमना वेगळं करु इच्छितात. हे चुकीचं आहे. पण काही वर्षांपूर्वी आलेल्या बिग थ्री मॉडेल सारखंच हेदेखील अपयशी ठरेल, असं राशिद लतीफ म्हणाला.
आयसीसीकडून ४ देशांच्या सुपर सीरिजला मान्यता नाही. आयसीसीच्या नियमांनुसार जास्तीत जास्त फक्त ३ देशांमध्येच सीरिज होऊ शकते. त्यामुळे आता आयसीसी या सुपर सीरिजला परवानगी देणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.