एका जिद्दीची कहाणी : कॅन्सरने पाय गमावला, तरीही तिने धावण्याचा विक्रम रचला

2001 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी हा रोग शरीरात अन्यत्र पसरू नये म्हणून ऑपरेशन करून तिचा पाय कापला गेला.

Updated: May 17, 2022, 05:37 PM IST
एका जिद्दीची कहाणी  : कॅन्सरने पाय गमावला, तरीही तिने धावण्याचा विक्रम रचला title=
प्रिटोरिया : दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया येथे जन्मलेल्या आणि वाढलेल्या जॅकी हंट ब्रोअर्मा हिला हाडांमध्ये आणि आजूबाजूला होऊ शकणारा दुर्मिळ कर्करोग झाला. 2001 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी हा रोग शरीरात अन्यत्र पसरू नये म्हणून ऑपरेशन करून तिचा पाय कापला गेला.
 
 2001 मधील ही घटना जॅकी हंट ब्रोअर्मासाठी धक्कादायकच. ऑपरेशन यशस्वी झाले, परंतु हंट-ब्रोअर्माला त्वरीत नवीन जीवनाशी जुळवून घेणे शिकावे लागले, पहिली दोन वर्ष तिच्यासाठी अत्यंत कठीण गेली. हळूहळू तिने स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात केली.
 
कॅन्सर झाल्याचा मनात राग होता. त्यातच पाय गेल्यामुळे हालचाली मंदावल्या. एकटेपणाची लाज वाटू लागली. तिने कृत्रिम पाय बसवून घेतला. सार्वजनिक ठिकाणी जाताना लांब पँट घालू लागली. जेणेकरून लोकांना कृत्रिम पाय लक्षात येऊ नये.
 
तिचा नवरा एडविन काही मॅरेथॉन शर्यतीत शबागी झाला होता. तिलाही आपण धावू शकतो असं वाटू लागलं. त्यासाठी तिने ब्लेड रनर नावाचा ऍथलेटिक प्रोस्थेटिक पाय वापरायला सुरवात केली. 
 
या नव्या पायाचा धावण्यासाठी फारच उपयोग झाला. ती आता दोन मुलांसह 40 वर्षांची झाली होती. तिच्या आयुष्यात यापूर्वी तिने कधीही ऍथलेटिक केले नव्हते. पण ती आता सज्ज झाली होती नव्या विश्वविक्रमाला...
 
सकाळ, संध्याकाळ तिचा सराव सुरु झाला...  आणि पहिल्यांदाच 2016 मध्ये तिने पहिल्या 6.2 मैल धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला. शर्यतीच्या पूर्वसंध्येला तिने तिची नोंदणी हाफ मॅरेथॉन श्रेणीत केली. ती त्यात पहिली आली मग तिने मागे वळून पाहिले नाही.
 
जॅकी हंट ब्रोअर्मा हिची 2021 मध्ये 95 दिवसांत 95 मॅरेथॉन धावणारी धावपटू अ‍ॅलिसा क्लार्क ही प्रेरणा बनली. या महिन्याच्या सुरुवातीला धावपटू केट जेडेनने 101 दिवसांत 101 मॅरेथॉनमध्ये ​​विक्रम प्रस्थापित केला होता. त्यामुळे हंट-ब्रोअर्मा हिने आपले लक्ष्य 102 दिवस इतके केले. 
 
 
२०२२ जानेवारी महिन्यात जॅकी हंटने विश्वविक्रमाकडे आपली पावले टाकायला सुरुवात केली. 46 वर्षांची जॅकी हंट सतत 104 दिवस दरराेज 42 किमी अंतर धावत होती. सतत 104 दिवसांत 104 मॅरेथॉन शर्यत धावणारी ती पहिली जागतिक अपंग महिला ठरली. तिच्या या विक्रमामुळे तिचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये कोरले गेले आहे.
 
या विश्वविक्रमासोबतच जॅकीने ब्लेड रनर्स या एनजीओसाठी चक्क 88 हजार डाॅलरचा निधीही जमवून दिला आहे.