जयपूर : भारताच्या टेस्ट टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये फार संधी मिळाली नाही. वर्ल्ड कपसाठी भारतीय टीममध्ये चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार, याबद्दल अजूनही संभ्रम कायम आहे. काही महिन्यांपूर्वी निवड समितीचे सदस्य एमएसके प्रसाद यांनी या क्रमांकासाठी आम्ही अजिंक्य रहाणेचा विचार करत आहोत, असं वक्तव्य केलं होतं. पण अजिंक्यला भारताच्या वनडे टीममध्ये निवडण्यात आलं नाही. त्यामुळे आता वर्ल्ड कपच्या टीममध्ये रहाणेची निवड होणं जवळपास अशक्य आहे.
अजिंक्य रहाणे हा आयपीएलमध्ये राजस्थानचा कर्णधार आहे. २३ एप्रिलपासून आयपीएलला सुरुवात होत आहे. याआधी रहाणे भारतीय टीममधल्या त्याच्या पुनरागमनावर म्हणाला, 'मी कोणत्या क्रमांकावर बॅटिंग करावी, याबद्दल माझी कधीच तक्रार नव्हती. जेव्हा मला संधी मिळाली, तेव्हा मी चांगली कामगिरी केली आहे. भारतीय टीममधल्या चौथ्या क्रमांकाबद्दल विचार करुन मला स्वत:वर दबाव टाकायचा नाही. बॅटिंगचा क्रम बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतो, असं मला वाटतं. मी भारतासाठी कोणत्याही क्रमांकावर खेळायला तयार आहे.'