मुंबई : भारतीय टेस्ट टीमचा माजी उपकर्णधार आणि मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणे याने त्याच्या बालपणीतील शाळेच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सध्या अजिंक्य रहाणे टेस्ट टीमचा भाग नाही. त्यामुळे खास एक दिवस काढून त्याने डोंबिवलीच्या शाळेत पोहोचला होता. यावेळी त्याचं कुटुंबही त्याच्यासोबत होतं.
डोंबिवलीच्या एसवी जोशी हाई स्कूलमध्ये अजिंक्य रहाणेचं शालेय शिक्षण झालं. शाळेत गेल्यानंतर अजिंक्य रहाणेने त्याच्या इन्स्टाग्रामवरून एक व्हिडीयो शेअर केला आहे. हा व्हिडीयो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, मी माझ्या कुटुंबासोबत डोंबिवलीमध्ये गेले होतो. जागा भले कितीही बदलली असली तरी हृदयात त्याची जागा तशीच राहते.
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीमने ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यानंतर मात्र गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंज देतोय. श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी टीममध्ये त्याचं सिलेक्शन करण्यात आलं नाही.
रहाणे त्याच्या शाळेत गेला होता तेव्हा त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि मुलगी आर्या देखील त्याच्या सोबत होती. या व्हिडियोमध्ये रहाणे म्हणतो, मी गेल्या अनेक वर्षांपासून इथे येऊ इच्छित होतो. मात्र आता मला इथे येणं शक्य झालं आहे. मी या जागेपासून सुरुवात केली होती आणि माझ्या शाळेने नेहमी मला पाठिंबा दिला. आता शाळेत खूप बदल झाले आहेत. इथे येऊन मला फार आनंद झाला."