Gujarat Titans Shocked By This Approach : इंडियन प्रिमिअर लीगची ट्रेड विंडो ओपन असताना मुंबई इंडियन्सच्या संघाने गुजरात टायटन्सच्या कॅप्टनलाच आपल्या संघात घेतलं. गुजरातला पहिल्याच पर्वात विजय मिळवून देणारा कर्णधार हार्दिक पंड्या त्याच्या जुन्या आयपीएल संघाकडे म्हणजेच मुंबईकडे परतला आहे. पंड्याने 2022 मध्ये गुजरातला जिंकवलं आणि त्यानंतर 2023 मध्ये गुजरातचा संघ उपविजेता राहिला. मात्र हार्दिक पंड्याने अशाप्रकारे तडकाफडकी गुजरातचा निरोप घेतल्याने धक्क्यात असलेल्या गुजरातच्या चाहत्यांना आणखीन एक मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. ही शक्यता गुजरात टायटन्सच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीच व्यक्त केली आहे.
हार्दिक पंड्याच्या पाठोपाठ आता गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीही संघाला सोडचिठ्ठी देण्याची किंवा त्याला या संघातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे दाट शक्यता आहे. गुजरात टायटन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी कर्नल अरविंद सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक संघ मालकांनी शामीशी संपर्क साधला आहे. ट्रेडींगची विंडो ओपन असतानाच चुकीच्या पद्धतीने शामीला संघात घेण्याचा प्रयत्न चुकीच्या मार्गाने झाल्याचा दावा केला जात आहे.
"अव्वल खेळाडूंना आपल्या संघामध्ये घेण्याचा हक्क प्रत्येक संघाला आहे. मात्र यामध्ये चुकीची गोष्ट हीच आहे की संघ थेट खेळाडूंशी संपर्क साधतात. ही पद्धत चुकीची आहे आणि गुजरात टायटन्सचं व्यवस्थापन या अशा पद्धतीमुळे समाधानी नाही. बीसीसीआयचे खेळाडूंच्या ट्रेडिंगसंदर्भातील नियम आहेत. कोणताही संघ त्यांना खेळाडूमध्ये रस आहे असं सांगून मग बीसीसीआय आम्हाला ते सांगणार अशी पद्धत आहे. त्यानंतर त्या खेळाडूबद्दलचा निर्णय संघ घेतो. आयपीएलचे संघ तेथ आमच्या कोचिंग स्टाफशी संपर्क साधतात हे फार चुकीचं आहे. त्यांना ट्रान्सफर हवी असेल तर त्यांनी थेट आमच्याशी बोलावं. आम्हाला या गोष्टीबद्दल नंतर समजतं," असं कर्नल अरविंद सिंह म्हणाले. मात्र शामीशी कोणत्या संघाने संपर्क साधला हे स्पष्ट झालेलं नाही.
मोहम्मद शामी हा वर्ल्ड कप 2023 मधील भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. मागील 2 पर्वांपासून शामी गुजरातकडून खेळताना दिसत आहे. वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर आता शामीशी संपर्क साधून त्याला आपल्या संघात घेण्यासाठी सर्वच संघांच्या कुरापती सुरु आहेत. दुसरीकडे हार्दिक पंड्याने संघ सोडल्यानंतर गुजरात टायटन्सने शुभमन गिलकडे संघाची धूरा सोपवली आहे. मुंबई इंडियन्से गुजरात टायटन्सकडून हार्दिक पंड्याला ट्रेड केलं आहे. पाचवेळा इंडियन प्रिमिअर लिगच्या चषकावर नाव कोरणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाने हार्दिकसाठी 15 कोटी रुपये मोजले असून या व्यतिरिक्त बरीच रक्कम ट्रान्सफर फी म्हणूनही मोजली आहे. रोहित शर्मानंतर मुंबईची धूरा हार्दिककडे सोपवण्याची चर्चा आहे.