सिडनी : अॅशेस मालिकेतील अंतिम सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने ही मालिका ४-०ने खिशात घातलीये. सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्ंलंडविरुद्ध एक डाव आणि २३ धावांनी ऐतहासिक विजय मिळवला.
३०३ धावांनी पिछाडीवर असलेल्या इंग्ंलंडच्या संघाला दुसऱ्या डावात केवळ १८० धावा करता आल्या. दरम्यान, यात ज्यो रुटने अर्धशतकी खेळी साकारली मात्र ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. चौथ्या दिवशी डायरियामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले.
पहिले सत्र : चौथ्या दिवशी सकाळी इंग्लंडची धावसंख्या चार बाद ९३ इतकी होती. खेळपट्टीवर ज्यो रुट आणि जॉनी बेअरस्ट्रॉ असणार होते मात्र आदल्या रात्री रुटला डिहायड्रेशनचा तसेच उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. ज्यामुळे मोईन अलीने सकाळच्या सत्राची सुरुवात केली.
ऑस्ट्रेलियाला मोईन अलीच्या रुपात पहिले यश मिळाले. नॅथन लॉयनने त्याची विकेट काढली. त्याने १३ धावांवर पायचित केले. यासोबतच या मालिकेत सातव्यांदा मोईन अलीला बाद करण्याचा विक्रम लॉयनने केला. यावेळी इंग्लड १८२ धावांनी पिछाडीवर होता. यानंतर कर्णधार ज्यो रुट आपला डाव पूर्ण करण्यास उतरला आणि त्याने अर्धशतक साजरे केले. जेवणापर्यंत इंग्लंडने पाच विकेट गमावताना १४४ धावा केल्या होत्या.
दुसरे सत्र : लंचनंतर ज्यो रुट पुन्हा खेळपट्टीवर येऊ शकला नाही. त्याच्या जागी टॉम कुरेन फलंदाजीसाठी उतरला. मात्र त्यानंतर तीन षटकानंतर पॅट कमिन्सने बेअरस्ट्रॉची विकेट मिळवली. स्टुअर्ट ब्राडही झटपट बाद झाला. त्यानंतर एकामागोमाग एक इंग्लंडचे फलंदाज बाद होत गेले आणि ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकली.