नवी दिल्ली : भारताचा अनुभवी आणि वेगवान गोलंदाज आशीष नेहराने क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे.
१ नोव्हेंबरला भारत - न्यूझीलंड दरम्यान खेळल्या जाणार्या पहिल्या टी-२० सामन्यामध्ये आशीष नेहरा निवृत्ती घेणार आहे. पण दिल्लीच्या स्टेडियमवर शेवटचा सामना खेळण्याचं त्यांचं स्वप्न कदाचित अधुरं राहण्याची शक्यता आहे.
सिलेक्टर्सच्या अंतिम क्षणाला येणार्या निर्णयावर आशीष नेहराचा शेवटचा सामना नेमका कोणता असेल हे ठरणार आहे. काही वर्षांपूर्वी सिलेक्टर्सच्या अशाच निर्णयामुळे वीरेंद्र सेहवागलादेखील कोटला मैदानावर त्याची शेवटची मॅच खेळण्याची इच्छा अपूर्ण राहिली होती.
न्यूझीलंडच्या विरोधात खेळल्या जाणार्या टी २० सामन्यामध्ये आशीष नेहराची निवड झाली आहे. मात्र तो खेळणार की नाही यावर मात्र अजूनही शिक्कामोर्तब झालेले नाही.
भारतीय संघाच्या निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'न्यूझीलंड विरोधात फिरोज शहा कोटलावर खेळल्या जाणार्या पहिल्या टी २० मॅच दरम्यान नेहराच्या निवडीबाबत अजून कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही. सामन्याच्या दिवशी याबाबत शेवटचा निर्णय घेतला जाईल.'
आशीष नेहराचं क्रिकेट करियर आणि दुखापती
आशीष नेहरांच्या करिअरमध्ये त्याला अनेक दुखापतींचा सामना करावा लागला. संपूर्ण करिअरमध्ये त्याच्यावर १२ लहान मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या. २०१६ साली त्याचे भारतीय संघामध्ये पुनरागमन झाले. २०११ सालीदेखील दुखापतींवर मात करून वर्ल्ड कपमध्ये निवड झाल्यानंतर त्याने भारतीय संघाला विजय मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली होती.