मुंबई : पुढील काही महिन्यांमध्ये टी 20 वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सर्व संघांनी तयारी केली आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने खंत व्यक्त केली आहे. "ऑस्ट्रेलियाकडे महेंद्रसिंह धोनी आणि हार्दिक पंड्यासारखे फिनिशर नाही. तसेच ऑस्ट्रेलिया टीमच्या मीडल ऑर्डर किंवा शेवटच्या काही स्थानांनावर विकेटकीपर बॅट्समन नाही. जर अशी दुहेरी कामगिरी करणारा खेळाडू मिळाला तर फायदेशीर ठरेल", असंही पॉन्टिंगने स्प्ष्ट केलं. पॉन्टिंगने क्रिकेट डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत याबाबत भाष्य केलं. (Australia do not have finishers like Mahendra Singh Dhoni and Hardik Pandya says Ricky Ponting)
"फिनिशर नसणं हे चिंताजनक"
ऑस्ट्रेलियाकडे सर्वोत्तम फिनिशर नसणं हा फार चिंतेचा विषय आहे. ऑस्ट्रेलियाला 3-4 ओव्हर खेळून 50 धावा करण्याची क्षमता असलेला फिनीशर हवाय. धोनीने आपल्या कारकिर्दीत हे कामगिरी सार्थपणे पार पाडली. तसेच हार्दिक पंड्या आणि कायरन पोलार्डही या प्रकारात मोडतात. या दोघांनी आपल्या देशाला अनेकदा सामने जिंकून दिले आहेत", असंही पॉन्टिंगने यावेळेस नमूद केलं. पॉन्टिंग आगामी टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोचिंग स्टाफचा एक भाग असणार आहे. तसंच पॉन्टिंगने 2019 च्या वर्ल्ड कपमध्येही सहाय्यक प्रशिक्षकाची भूमिका सार्थपणे पार पाडली आहे.
"बिग बॅश लीगमध्ये ऑस्ट्रेलियाचे स्टार फलंदाज हे पहिल्या 4 क्रमांकावर खेळतात. यामुळे ऑस्ट्रेलियाकडे चांगले फिनिशर नाहीत. मार्कस स्टोयनिस फिनीशरची भूमिका चोखपणे पार पाडू शकतो. मी स्टोयनिसला आयपीएलमध्ये शेवटच्या क्रमांकावर दिल्ली कॅपिट्ल्सकडून बॅटिंग करताना पाहिलंय. मार्कसने बिग बॅश लीगमध्ये सलामीला खेळताना मेलबर्न स्टार्सला चांगली सुरुवात मिळवून दिली आहे. पण मला असा फिनिशर हवाय ज्याच्यात एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता असेल. मार्कसने दिल्ली कॅपिट्ल्सला 2-3 सामन्यांमध्ये बॅटिंगच्या जोरावर विजय मिळवून दिला आहे", असंही पॉन्टिंगने स्पष्ट केलं.