Shane Warne Death : ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज शेन वॉर्नचं (Shane Warne) वयाच्या 52 व्या वर्षी निधन झालं. वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं समोर आलं होतं. पण त्यानंतर थायलंड पोलिसांच्या अहवालात वॉर्नच्या खोलीत रक्ताचे डाग आढळून आले होते. त्यामुळे वॉर्नचा मृत्यू झाला की घातपात असा संशय व्यक्त करण्यात येत होता.
आता शेन वॉर्नचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे. यात मोठा खुलासा झाला आहे.
पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये खुलासा
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्नच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार त्याचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याची माहिती थायलंड पोलिसांनी दिली आहे. पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांचा अहवाल वॉर्नच्या कुटुंबीयांना आणि ऑस्ट्रेलियन दूतावासाला पाठवण्यात आला आहे, असं राष्ट्रीय पोलिस उपप्रवक्ता किसाना पठानाचारोन यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला याबद्दल त्याच्या कुटुंबीयांना कोणतीही शंका उपस्थित केलेली नाही असंही यात म्हटलं आहे.
हृदयविकारामुळे मृत्यू
निवेदनात मृत्यूचं कारण उघड करण्यात आलेले नाही. वॉर्नला हृदयविकाराचा झटका आल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. थायलंडमधील कोह सामुई बेटावर वॉर्न त्याच्या हॉटेलच्या खोलीत बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.
कुटुंबावर दु:खाचा डोंगर
शेन वॉर्नचे वडील कीथ आणि आई ब्रिजिटने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'शेनशिवाय भविष्याची कल्पना करू शकत नाही. त्याच्यासोबतच्या असंख्य आनंदी आठवणी आपल्याला या दु:खावर मात करण्यास मदत करतील, असं त्यांनी म्हटलं आहे.
वॉर्नचा मुलगा जॅकसनने लिहिलंय, 'तुमच्या जाण्याने माझ्या हृदयातील पोकळी कोणी भरून काढू शकेल, असे मला वाटत नाही. तुम्ही सर्वोत्कृष्ट वडील आणि मित्र होता.