विराट-सॅम कोन्स्टान्स वादावर ऑस्ट्रेलियन मीडियाने काय छापलं? कोहलीवर टीका करताना ओलांडली पातळी, म्हणाले 'जोकर...'

Virat Kohli Insulted by Australian Media: भारत आणि ऑस्ट्रेलियामधील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय स्टार क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आणि सॅम कोन्स्टास (Sam Konstas) यांच्यात वाद झाला. यानंतर ऑस्ट्रेलियन मीडियाने त्याच्यावर अपमानजक टिप्पणी केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 27, 2024, 04:25 PM IST
विराट-सॅम कोन्स्टान्स वादावर ऑस्ट्रेलियन मीडियाने काय छापलं? कोहलीवर टीका करताना ओलांडली पातळी, म्हणाले 'जोकर...' title=

Virat Kohli Insulted by Australian Media: भारत आणि ऑस्ट्रेलियामधील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय स्टार क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आणि सॅम कोन्स्टास (Sam Konstas) यांच्यात वाद झाला. यानंतर विराट कोहलीला मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. मॅच रेफ्री अँडी पायकॉफ्ट यांनी याप्रकरणावर निकाल दिला असला तरी ऑस्ट्रेलियामधील प्रसारमाध्यमांनी मात्र विराट कोहलीला क्लीन चीट देण्यास तयार नाहीत. विराट कोहलीला फक्त एक डिमेरिट गुण आणि 20 टक्के दंड ठोठावणं ऑस्ट्रेलिया मीडियाला आवडलेलं नाही. 

ऑस्ट्रेलियाकडून सॅम कोस्टासने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. 19 वर्षीय सॅमने पहिल्याच सामन्यात तुफान फलंदाजी केली. दरम्यान मैदानात विराट कोहलीसह त्याचा वाद झाल्यानेही चर्चा रंगली. झालं असं की, नववं षटक संपल्यानंतर विराट कोहली जाणुनबुजून दिशा बदलून सॅमच्या दिशेने चालत गेला आणि त्याला खांद्याने धडक दिली. यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. यावेळी ख्वाजा मधे पडल्याने वाद निवळला. 

'अम्पायर काय नुसते पाहत बसलेत', सुनील गावसकर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर संतापले; 'रोहित शर्मा सांगूनही...'

 

मैदानावरील पंच जोएल विल्सन, मायकल गॉफ, तिसरे पंच शर्फुदौला इब्ने शाहिद, चौथे पंच शॉन ग्रेग यांनी कोहलीवर आयसीसी आचारसंहितेच्या नियम 1 चं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे. खेळ संपल्यानंतर विराट कोहलीने चूक मान्य केल्याने औपचारिक सुनावणी झाली नाही. कोहलीला सामन्याच्या मानधनातून 20 टक्के दंड ठोठावण्यात आला असून, एक दोषांकही देण्यात आला आहे. पण विराट कोहलीला इतकी कमी शिक्षा होणं ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांच्या पचनी पडलेलं नाही. आपली नाराजी व्यक्त करताना ऑस्ट्रेलियन मीडियाने पातळी ओलांडली असून वृत्तपत्राता त्याचा जोकर असा उल्लेख करत फोटो छापला आहे. 

'द वेस्ट ऑस्ट्रेलियन'ने 'विदूषक कोहली' या मथळ्याचा वापर करून भारताच्या माजी कर्णधाराचा अपमान केला आहे. तसंच कोहलीला त्याच्या कृत्याबद्दल सूक (रडणारा किंवा भित्रा) देखील म्हटलं आहे. 

19 वर्षीय सॅमने पहिल्याच सामन्यात धमाकेदार खेळी केली. जसप्रीत बुमराहचा सामना करताना त्याने एका षटकात 18 धावा कुटल्या. त्याने एकूण 60 धावा केल्या, ज्यातील 34 फक्त बुमराहच्या विरोधात होत्या. याचदरम्यान विराट कोहली आणि त्याच्यात वाद झाला. 

या वादाबद्दल ANI यशी बोलताना बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी म्हणाले, "मी ही घटना (विराट कोहली-सॅम कोन्स्टास वाद) पाहिली नाही, परंतु या गोष्टी क्रिकेटच्या मैदानावर घडतात. तुम्हाला ते स्वीकारावे लागेल आणि पुढे जावे लागेल". दरम्यान सॅमने विराट कोहलीने चुकून धक्का दिल्याचं म्हटलं आहे. "मी माझे ग्लोव्ह अॅडजस्ट करत होतो. मला वाटतं त्याने चुकून मला धडक दिली. पण मला वाटतं हे फक्त क्रिकेट आहे".