PV Sindhu Engagement : भारताची बॅटमिंटनपटू आणि टोकियो ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती पीव्ही सिंधू (PV Sindhu) लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच ऑलिम्पिकपासून राष्ट्रकुल खेळापर्यंत देशाला गौरव मिळवून देणाऱ्या पीव्ही सिंधूने तिच्या लग्नाच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. आता पीव्ही सिंधूच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत. यात सिंधू खूपच ग्लॅमरस दिसत असून तिचा नवरा व्यंकट दत्ता हा तिला अंगठी घालताना दिसत आहे.
22 डिसेंबरला पीव्ही सिंधू ही लग्नबंधनात अडकणार असून 24 तारखेला हैद्राबाद येथे त्यांच्या लग्नाचं रिसेप्शन पार पडणार आहे. रविवारी सिंधूने तिच्या साखरपुड्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला तिने 'खलील जिब्रान यांचा कोट - जेव्हा प्रेम तुम्हाला इशारे देईल तेव्हा त्याचे अनुसरण करा, कारण प्रेम स्वतःशिवाय काहीही देत नाही' असं कॅप्शन दिलं.
सिंधूच्या लग्नाशी संबंधित कार्यक्रम 20 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. तर त्यांचा विवाह ड्रीम डेस्टिनेशन असलेल्या उदयपूरमध्ये होणार आहे. या लग्नासाठी पीव्ही सिंधू हिने सचिन तेंडुलकरला देखील लग्नपत्रिका देऊन खास आमंत्रित केलं आहे. काही दिवसांपूर्वी सचिनने याबाबत पोस्ट करून पीव्ही सिंधूला शुभेच्छा दिल्या होत्या.
सिंधूचा भावी पती व्यंकट दत्ता हे साई पोसाइडेक्स टेक्नॉलॉजीजचा कार्यकारी संचालक आहेत. 2019 पासून, वेंकट दत्ता साई सोर हे ऍपल ॲसेट मॅनेजमेंटमध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करत आहेत आणि पॉसाइडेक्समध्ये कार्यकारी संचालक म्हणून काम करत आहेत. सिंधूचे वडील पीव्ही रमणा यांनी पीटीआयला सांगितले की, 'दोन्ही कुटुंबे एकमेकांना ओळखत होती पण एक महिन्यापूर्वीच सर्व काही ठरले होते. ही एकमेव वेळ होती कारण जानेवारीपासून पुढील स्पर्धांसाठी तिचे प्रशिक्षण सत्र सुरु होणार होते'.
सिंधू ही भारतातील सर्वात दिग्गज खेळाडूंपैकी एक मानली जाते जिने 2019 मध्ये सुवर्णासह जागतिक स्पर्धेत पाच पदके जिंकली आहेत. याशिवाय त्याने ऑलिम्पिक स्पर्धेतही रौप्य आणि कांस्यपदक जिंकले आहेत. चॅम्पियन बॅडमिंटनपटूने रिओ 2016 आणि टोकियो 2020 मध्ये सलग ऑलिम्पिक पदके जिंकली आणि 2017 मध्ये करिअर-सर्वोत्तम जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान मिळवले. पीव्ही सिंधू ही जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंपैकी एक आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार, पीव्ही सिंधूची कमाई सुमारे 7.1 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयांमध्ये सुमारे 60 कोटी रुपये आहे.