जालना : महाराष्ट्र केसरीची मानाची गदा बाला रफिक शेखने पटकावली आहे. गतविजेत्या अभिजीत कटकेला एकतर्फी मात देत त्याने महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला. या स्पर्धेत अभिजित कटके हा मानाचा दावेदार मानला जात होता त्याने सुरुवातही तशी केली होती. पण बाला कटकेनं सुरूवातीपासूनच स्वत:कडे आघाडी ठेवली. तो महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत होता पण महाराष्ट्र केसरी होण्याचा मान त्याच्या नशिबी येत नव्हता. पण त्याने हार मानली नाही आणि महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावल्याचे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक राम सारंग यांनी सांगितले.
अभिजीतने पहिल्या मिनिटातच जोरदार आक्रमण करत आघाडी मिळवली होती. पण यामध्ये त्याला सातत्य टिकवता आले नाही. पहिल्या फेरीत बाला ३ आणि अभिजित १ गुणांवर होते. जालना शहरातील आझाद मैदानावर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान गादी गटात पुण्याचा अभिजित कटके आणि रवींद्र शेंडगे यांच्यात लढत झाली यात अभिजित कटकेनं रवींद्र शेंडगेला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला तर माती गटात झालेल्या उपांत्य फेरीत बुलडाण्याच्या बाला रफिकने रत्नागिरीच्या संतोष दोरवडचा प्राभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.