माउंट मोनगानुई : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या विजयी दौऱ्यापासून ते आता सुरु असलेल्या न्यूझीलंड दौऱ्याच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यांपर्यंत बहुविध पद्धतींनी विक्रमी कामगिरी केली आहे. यात प्रामुख्याने युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या फिरकीपटू जोडीचे नाव सर्वात अग्रणी आहे. या दोघांच्या जो़डीने आपल्या फिरकीने विरोधी संघाच्या फलंदाजांना हैराण करुन सोडले आहे. या जोडीने १०० विकेटचा टप्पा गाठला आहे.
युजवेंद्र चहल आणि चायनामॅन फिरकीपटू कुलदीप यादव या जोडीने किंवीच्या नाकी नऊ आणले आहेत. या जोडीने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात १०० विकेटचा टप्पा ओलांडला आहे. या फिरकीपटूच्या जोडीने न्यूझीलंविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये एकूण १२ विकेट मिळवल्या. युजवेंद्र चहलने न्यूझीलंडविरुद्धच्या तिन्ही सामन्यात सलगपणे प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
कुलदीप यादवने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात सलगपणे प्रत्येकी चार विकेट घेतल्या. या कामगिरीमुळे तो सलग दोन एकदिवसीय सामन्यात चार विकेट घेणाऱ्या पहिल्या फिरकीपटूचा मान त्याने मिळवला. न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या सामन्यात देखील फिरकीची जादू पाहायला मिळाली. युजवेंद्र चहालने ९ षटाकांमध्ये केवळ २ विकेट घेतल्या. यात अर्धशतकी कामगिरी केलेल्या टॉम लॅथनला आणि कर्णधार केन विल्यमसनला त्याने माघारी धाडले.
कुलदीप यादवला तिसऱ्या सामन्यात विकेट घेता आली नाही. त्याने ८ षटकांमध्ये ४.८८ च्या सरासरीने फक्त ३९ धावा देत इतर गोलंदाजांना उत्तम साथ दिली. या जोडीने १०० विकेटचा टप्पा पुर्ण केल्याने बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटरवरुन या दोघांचे या कामगिरीसाठी अभिनंदन केले आहे.
That's 100 wickets between our very own #KulCha in ODIs#NZvIND #TeamIndia pic.twitter.com/MaYyNFtgn2
— BCCI (@BCCI) January 28, 2019
न्यूझीलंड दौऱ्याआधी या जोडीने एकूण ८७ विकेट घेतले होते. यात युजवेंद्र चहलच्या ३६ तर कुलदीप यादवच्या ५१ विकेटचा समावेश होता.