Shoaib Akhtar Statement : एशिया कप क्रिकेट स्पर्धाला आता काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. 30 ऑगस्टपासून एशिया कप स्पर्धेला (Asia Cup 2023) सुरुवात होणार आहे. पण सर्वांना उत्सुकता आहे ती भारत-पाकिस्तान सामन्याची (India vs Pakistan). 2 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तानचा संघ आमने सामने येईल. सामन्याबद्दल क्रिकेट प्रेमींना प्रचंड उत्सुकता आहे. पण त्याआधी पाकिस्तानाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) केलेल्या एका वक्तव्यावरुन क्रिकेट जगतात नवा वाद निर्माण झाला आहे. भारताकडून जो पैसा आयसीसीला मिळतो, त्यातला एक हिस्सा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिळतो आणि भारताच्या पैशांमधून पाकिस्तान क्रिकेटर्सना त्यांची फिस मिळते असं शोएब अख्तरने म्हटलं आहे.
शोएब अख्तरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण आपल्या वक्तव्यामुळे तो नेहमी चर्चेत असतो. गोलंदाजीच्या वेगाप्रमाणेच त्याचं बोलणंही बेधडक आहे. शोएब अख्तरच्या वक्तव्यामुळे अनेकवेळा वादही निर्माण झाला आहे. आता पुन्हा एकदा त्याच्या वक्तव्याने पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. भारताकडून मिळाणाऱ्या पैशांवर पाकिस्तानचे क्रिकेटर पोसले जातात, असं त्याने या मुलाखतीत म्हटलंय.
भारतीय क्रिकेट बोर्ड हे प्रचंड श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. भारतात क्रिकेट लोकप्रिय आहे आणि अनेक स्पर्धाही भारतात होत असतात. यातून बीसीसीआयला मोठा फायदा होतो. त्यामुळे बीसीसीआयकडून जो पैसा आयसीसीला येतो तो रेव्हेन्यू शेअरिंगअंतर्गत पीसीबीच्या (PCB) वाट्याला येतो. य पैशातून पाकिस्तान क्रिकेटर्सना त्यांची मॅच फी दिली जाते.
भारतात होणारी एकदिवसीय विश्वचषक कप स्पर्धा चुरशीची होणार आहे. या स्पर्धेतून भारताने भरपूर पैसे कममावेत असं मला वाटतं, असं शोएब अख्तरने म्हटलं आहे. विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियावर सर्वाधिक दबाव असेल. प्रत्येकवेळी असंत होतं. पाकिस्तान संघाकडून टीम इंडिया हरते कारण टीम इंडियात चांगले खेळाडू नाहीएत, असं नाही, तर टीम इंडियावर दबाव असतो. गेल्या एशिया कप स्पर्धेत भारतीय मीडियाने टीम इंडियावर भरपूर दबाव टाकला होता. संपूर्ण स्टेडिअममध्य निळा रंग दिसत होता. भारत पाकिस्तानला सहज हरवेल असंही बोललं जात होतं. याचा दबाव टीम इंडियाचा खेळाडूंवर होतं, याऊलट पाकिस्तानच्या संघावर कोणतंही प्रेशर नव्हतं. परिणामी टीम इंडियाचा पराभव झाला, असं शोएब अख्तरने म्हटंलय.
शोएब अख्तरनं 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं. शोएब क्रिकेट कारकिर्दीत 163 एकदिवसीय सामने खेळला आणि 247 विकेट घेतल्या आहेत. तर, 46 कसोटी सामन्यात 178 विकेट घेतल्या आहेत.