गोल्ड कोस्ट : २१व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा पदकांचा धडाका आठव्या दिवशीही सुरुच आहे. पुरुषांच्या ५७ किलो फ्री स्टाईल वजनी गटात भारताच्या राहुल आवारेने सुवर्णपदक पटकावलेय. त्याने कॅनडाच्या स्टीव्हन ताकाहाशीवा १५-७ या मोठ्या फरकाने हरवले. भारताचे हे २७वे पदक आहे. यात १३ सुवर्णपदके, ६ रौप्य आणि ८ कांस्यपदकांचा समावेश आहे.
आवारेने सेमीफायनलमध्ये पाकिस्तानच्या मोहम्मद बिलालला १२-८ असे पराभूत केले. सुरूवातीपासूनच राहुल आवारे मोहम्मदवर भारी होता. सुरुवातीला राहुलने ३-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या राऊंडपर्यंत ४-४ अशा बरोबरीत होते.
मात्र त्यानंतर राहुलने जबरदस्त खेळ करताना ही आघाडी १०-४ अशी वाढवली. त्यानंतर अखेरच्या क्षणामध्ये मोहम्मदने ४ गुण वाढवले. अखेरचे काही सेकंद बाकी असतानाच राहुलने आणखी दोन गुण मिळवत १२-८ असा विजय मिळवला.
बबिताने महिलांच्या ५३ किलो फ्री स्टाईल वजनी गटात रौप्यपदक पटकावले. त्यानंतर राहुलचे कुस्तीमधील हे दुसरे पदक आहे.