प्रवीण कुमारची क्रिकेटमधून निवृत्ती

२००७-०८ सालच्या सीबी सीरिजमध्ये भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूनं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

Updated: Oct 21, 2018, 05:23 PM IST
प्रवीण कुमारची क्रिकेटमधून निवृत्ती  title=

मुंबई : २००७-०८ सालच्या सीबी सीरिजमध्ये भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूनं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. भारताचा मध्यमगती बॉलर प्रवीण कुमार यानं ट्विटरवरून आपण संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. बॉलला स्पीड नसला तरी स्विंगच्या मदतीनं प्रवीण कुमारनं भारतीय टीममध्ये स्वत:ची जागा बनवली होती. मुख्य बॉलरना दुखापत झाल्यामुळे प्रवीण कुमारला टीममध्ये संधी मिळाली आणि या संधीचं त्यानं सोनं केलं.

प्रवीण कुमारनं स्वत:चा ठसा भारताचा २०११ सालचा इंग्लंड दौरा, आणि २००७-०८ सालच्या ऑस्ट्रेलियातल्या सीबी सीरिजमध्ये उमटवला. लॉर्ड्सवरच्या कामगिरीमुळे त्याचं नाव लॉर्ड्स मैदानातल्या ऐतिहासिक ऑनर बोर्डावरही लिहिण्यात आलं.

प्रवीण कुमारनं २००७ साली त्याच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये जयपूरहून केली. काही कालावधीतच प्रवीण कुमार झहीर खान आणि आशिष नेहरा यांच्यासोबत भारतीय टीमचा प्रमुख बॉलर झाला. सीबी सीरिजच्या फायनलमध्ये प्रवीण कुमारनं ४६ रन देऊन ४ विकेट घेतल्या. प्रवीणच्या या कामगिरीमुळे भारतानं ऑस्ट्रेलियामध्ये इतिहास घडवत वनडे सीरिज जिंकली.

६ टेस्ट मॅचमध्ये प्रवीण कुमारनं २७ विकेट घेतल्या. यामध्ये लॉर्ड्सवर ५ विकेट घेण्याचं रेकॉर्डही प्रवीण कुमारनं केलं आहे. डेंग्यू झाल्यामुळे प्रवीण कुमारला २०११ सालचा वर्ल्ड कप खेळता आला नाही.

आयपीएल २०१० मध्ये प्रवीण कुमारनं बंगळुरूकडून खेळताना राजस्थानविरुद्ध हॅट्रिकही घेतली आहे. रणजीमध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी ६८ रनवर ८ विकेट अशी आहे. २००८ सालच्या फायनलमध्ये दिल्लीविरुद्ध त्यानं हे रेकॉर्ड केलं. पण तरीही उत्तर प्रदेश तेव्हा ट्रॉफी जिंकू शकला नव्हता. आयपीएलमध्ये प्रवीण कुमार मुंबईकडूनही खेळला आहे.

प्रवीण कुमारला आता बॉलिंग प्रशिक्षक बनायचं आहे. मला कसलंच दु:ख नाही. मी मनापासून खेळलो, मनापासून बॉलिंग केली. मी खेळत राहिलो तर एक जागा अडून राहिलं. दुसऱ्या बॉलरबद्दलही विचार केला पाहिजे. माझी वेळ आता संपली आहे, आणि मी हे स्वीकार केलं आहे. उत्तर प्रदेशमधून आता चांगले बॉलर येत आहेत. मला त्यांची कारकिर्द घडवायची आहे, असं प्रवीण कुमार म्हणाला.

मी खूश आहे आणि संधी दिल्याबद्दल मला देवाचे धन्यवाद द्यायचे आहेत. मला बॉलिंग प्रशिक्षक बनायचं आहे. मला याचं ज्ञान असल्याचं सगळ्यांना माहिती आहे. या क्षेत्रातही मी मनापासून काम करू शकतो. मी माझा अनुभव तरुणांना देईन, अशी प्रतिक्रिया प्रवीण कुमारनं दिली.