मुंबई : मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरु असलेल्या तिरंगी मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताने इंग्लंडवर शानदार विजय मिळवत शेवट गोड केला. या सीरीजमधील भारताचा हा पहिला विजय आहे. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये कमकुवत क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमुळे भारताला पराभव सहन करावा लागला. मात्र अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने दोन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी करत विजय संपादन केला.
महिला संघाने शानदार गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षण केल्याने इंग्लडचा डाव १०७ धावांवर गारद झाला. या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने अप्रतिम कॅच घेतला. तिचा हा कॅच पाहून तुम्ही जडेजा-ऱ्होडसलाही विसराल.
इंग्लंडचा डाव १७व्या ओव्हरमध्ये सुरु होता. इंग्लंडच्या संघाने ७ विकेट गमावताना १०२ धावा केल्या होत्या. अनुजा पाटीलच्या दुसऱ्याच चेंडूवर हेझलने हवेत शॉट खेळला. यावेळी कर्णधार हरमनप्रीतने धावत जाऊन डाईव्ह मारत एका हाताने कॅच घेतला.
इंग्लंडचा संपूर्ण डाव १०७ धावांवर संपुष्टात आला. यानंतर टीम इंडियाची स्टार फलंदाज स्मृती मंधानाने ४१ चेंडूत ६२ धावा करताना सीरिजमधील पहिला विजय मिळवून दिला. प्लेयर ऑफ दी मॅचचा खिताब अनुजा पाटीलला देण्यात आला.