मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर पारंपरिक विरोधी संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानला नमवत भारताच्या अंडर १९ पुरुष क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ध़डक मारली. ज्यानंतर आता अवघ्या काही क्षणांमध्येच India vs Bangladesh भारत विरुद्ध बांगलादेश हे दोन संघ विश्वचषकासाठी एमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
न्यूझीलंडच्या संघावर उपांत्य फेरीत सहा गडी राखून मात करत बांगलादेशच्या संघाने U-19 Cricket World Cup 2020 Final मध्ये आपलं स्थान पक्कं केलं. तेव्हा आता गतविजेत्या भारतीय संघाला नमवत एक नवा इतिहास रचण्यात बांगलादेशचा संघ यशस्वी ठरेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तर, भारतीय संघसुद्धा विजयाची पुनरावृत्ती करत पुन्हा एकदा क्रीडा जगताची वाहवा मिळवतो का, यावरही साऱ्यांचं लक्ष असेल.
उपांत्य फेरीत पाकिस्तानला नमवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने यापूर्वी श्रीलंका, जपान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या संघाचा पराभव केला होता. तर, बांगलादेशच्या संघाने उपांत्य फेरित किवींवर मात करण्यापूर्वी झिम्बाब्वे, स्कॉटलँड, दक्षिण आफ्रिका या संघांना नमवलं होतं.
U-19 world cup : Mehnat.com इथे 'यशस्वी' भेटतो....; सेहवागची उत्साही प्रतिक्रिया
बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या यशस्वी जैस्वाल या भारतीय खेळाडूवर साऱ्यांच्याच नजरा असतील. यशस्वीची या स्पर्धेमध्ये सुरुवातीपासूनची कामगिरी पाहता या सामन्यातही त्याच्या फलंदाजीची अफलातून खेळी पाहता येण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला ३१२ (एक शतक आणि तीन अर्धशतकं) धावांसह यशस्वी स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये अग्रस्थानी आहे. तर, गोलंदाजीच्या विभागात रवी बिष्णोईच्या कामगिरीवरही मोठी मदार असेल.
The final of the Under 19 @cricketworldcup is almost here!
Who are you backing to take home the trophy?#U19CWC pic.twitter.com/AxTSgkm4Pp
— ICC (@ICC) February 9, 2020
भारतीय संघ विजयाची तयारी करत असतानाच, बांगलादेशलाही तितकंच महत्त्वं दिलं जाणं गरजेचं ठरेल. कारण, भारतीय फलंदाजांना बांगलादेशचा फिरकी गोलंदाज राकिबउल हसन याचं आव्हान असेल.
बांगलादेशचा संघ पहिल्यांदाच अंडर १९ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे अर्थातच संघातील खेळाडूंच्या आत्मविश्वास हा दुपटीने वाढला असेल. पण, आता भारतीय संघाचं आव्हान ते पेलणार का हे काही क्षणांनीच स्पष्ट होणार आहे.