दुबई: भारतीय संघ इंग्लंडवर मात करून अंतिम सामन्यात पोहोचला आहे. हा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड खेळवला जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघ भिडणार असून संपूर्ण जगाचं लक्ष या सामन्याकडे असणार आहे.
अंतिम सामना लॉर्ड्स येथे होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती पण आयसीसी आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने कोव्हिड -19चा धोका लक्षात घेऊन सुरक्षित ठिकाणी सामना घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे 18 जून ते 22 जून दरम्यान हा सामना साऊथॅम्पटन इथल्या हॅम्पशर बाऊलच्या बायो बबल मैदानावर खेळवला जाणार आहे.
ह्या मैदानावर खेळाडूंसाठी उत्तम सोयीसुविधा आहेत. याशिवाय दोन्ही संघांना तयारीसाठी इथे उत्तम वातावरण मिळू शकतं असंही यावेळी ICCच्या वरिष्ट अधिकाऱ्यांनी सांगितलं. सध्या तरी या भागामध्ये लॉकडाऊन आहे मात्र तिथल्या प्रशासनानं जर लॉकडाऊनचे नियम शिथिल केले तर काही नागरिकांना हा अंतिम सामना पाहण्यासाठी परवानगी देण्यात येऊ शकते. कोरोनाचा धोका आणि सोशल डिस्टन्सिंगचा विचार करता त्यावेळी हे ठरवलं जाऊ शकतं अशीही माहिती तिथल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघानं 3-1नं दणदणीत विजय मिळवल्यामुळे WTCच्या अंतिम सामन्यात खेळण्याचं निश्चित झालं. अहमदाबाद कसोटीदरम्यान ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल यांनी कामगिरी मोलाची ठरली आणि त्यांनी मालिकेवर टीम इंडियाची पकड अधिक मजबूत करण्यास मदत केली.