अदमदाबाद: भारत विरुद्ध इंग्लंड 5 टी 20 सामन्यांच्या सीरिजमध्ये तीन सामने नुकतेच पार पडले आहेत. ऐन मालिका रंगात आली असताना आता एक फोनमुळे मोठी खळबळ माजली आहे. एका अज्ञात व्यक्तीनं ही उर्वरित दोन सामने रद्द करण्याची मागणी केली आहे. पोलिसांना आलेल्या या निनावी फोनमुळे मोठी खळबळ उडाली.
टी 20 मालिकेत इंग्लंड संघाने 2-1ने आघाडी घेतली आहे. उर्वरित दोन सामने चुरशीचे होणार असल्याचं पाहायला मिळत असतानाच आलेल्या या फोनने सर्वांचीच तारांबळ उडाली. आधीच वाढत्या कोरोनामुळे नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी रद्द करण्यात आली आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशननं याबाबत माहिती दिली. तर केवळ इतकंच पुरेसं नसून उर्वरित सामनेही रद्द करा असा निनावी फोन करण्यात आला आहे.
भारत-इंग्लंड मालिका रद्द करा अन्यथा मी स्टेडियममध्ये आत्मदहन करेन अशी धमकी अज्ञात व्यक्तीनं पोलिसांना दिला आहे. जर हे रद्द झाले नाही तर मी स्वत:ला पेटवून घेईन असा दावा या व्यक्तीनं केला आहे.
या व्यक्तीच्या फोननंतर पोलिसांची तपासयंत्रणा कामाला लागली आणि धमकावणाऱ्या व्यक्तीला शोधून काढण्यात यश मिळालं. पोलिसांनी पंकज पटेल असे ओळखले असून तो गांधीनगरचा रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
वाढत्या कोरोनामुळे आता उर्वरित दोन टी 20 सामने प्रेक्षकांविनाच खेळवले जातील असं गुजरात क्रिकेट असोशिएसनच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. उर्वरित दोन सामने खूप रंजक असणार आहेत. इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेनंतर आता टी 20 मालिकेवर विजय मिळवण्यात टीम इंडियाला यश मिळणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.