मुंबई : टीम इंडिया आणि न्युझीलंडमध्ये (India vs New Zealand) तीन सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. आता दुसरा सामना उद्या 20 नोव्हेंबर रोजी ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. कर्णधार हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची (Team India) प्लेइंग इलेव्हन समोर आली आहे. या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार आहे, हे जाणून घेऊयात.
हे ही वाचा : दुसऱ्या टी20 सामन्यावर पावसाचे सावट, हवामानाचा अंदाज काय?
न्यूझीलंड मालिकेतून रोहित शर्मा आणि केएल राहुल या दोघांनाही विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या जागी ईशान किशन आणि शुभमन गिलला सलामीची संधी मिळू शकते. हे दोन्ही खेळाडू स्फोटक फलंदाजीसाठी ओळखतात. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत ईशान किशनने याआधीही सलामीची जबाबदारी पार पाडली आहे.
हे ही वाचा : क्रिकेट की फुटबॉल, सर्वाधिक प्राईज मनी कोणत्या खेळात मिळतो?
विराट कोहली टीम इंडियासाठी (Team India) तिसऱ्या क्रमांकावर सर्वात विश्वासार्ह फलंदाज म्हणून उदयास आला आहे, परंतु तो न्यूझीलंड मालिकेत खेळत नाही. अशा स्थितीत त्याच्या जागी श्रेयस अय्यरला संधी दिली जाऊ शकते. अय्यरमध्ये कोणत्याही खेळपट्टीवर धावा काढण्याची क्षमता आहे.
सूर्यकुमार यादवने (Surykumar Yadav) 2022 च्या T20 वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करून सर्वांची मने जिंकली होती. अशा स्थितीत त्याला चौथ्या क्रमांकावर उतरण्याची संधी मिळू शकते. त्याचबरोबर विकेट किपिंगची जबाबदारी ऋषभ पंतकडे सोपवली जाऊ शकते. हार्दिक पांड्या सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरू शकतो.
भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) टी-20 विश्वचषक 2022 मध्ये चांगला खेळ दाखवू शकला नाही. अशा स्थितीत तो चांगली गोलंदाजी करण्यासाठी हतबल असेल. त्याला साथ देण्यासाठी हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग यांना संघात संधी मिळू शकते. युझवेंद्र चहलकडे फिरकी विभागाची जबाबदारी मिळू शकते. त्याचबरोबर वॉशिंग्टन सुंदरला अष्टपैलू म्हणून स्थान मिळू शकते.
संभाव्य प्लेईंग इलेव्हन : हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल.