ख्राईस्टचर्च : अंडर १९ वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताने पाकिस्तानला २०३ धावांनी पराभवाची धूळ चारत फायनलमध्ये जागा पक्की केली.
या सामन्यात मॅन ऑफ दी मॅच राहिला शुभमन गिल. या सामन्यातील विजयासह भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले.
१. अंडर १९च्या इतिहासात सहावेळा फायनलमध्ये पोहोचणारा भारत हा पहिला संघ ठरलाय. याआधी हा रेकॉर्ड पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. या दोनही संघांनी ५-५ वेळा फायनलमध्ये मजल मारली होती.
२. अंडर १९मधील भारतीय संघाचा हा दुसरा मोठा विजय आहे. या सामन्यात भारताने पाकिस्तानला २०३ धावांनी हरवले. याआधी २००६मध्ये भारताने इंग्लंडला २३४ धावांनी हरवले होते.
३. भारताने पाकिस्तानला विजयासाठी २७३ धावांचे आव्हान दिले होते. मात्र पाकिस्तानचा संघ १०० धावाही करु शकला नाही. भारतीय संघाने अंडर-19मध्ये आतापर्यंत ज्या संघासमोर २७०हून अधिक धावांचे लक्ष्य ठेवले होते ते संघ आव्हान पूर्ण करु शकले नाहीत.
४. या सामन्यातील पाकिस्तानची धावसंख्या अंडर १९मधील तिसरी सर्वात नीचांकी धावसंख्या आहे. याआधी पाकिस्तानने अफगाणिस्तानविरुद्ध सर्वात कमी धावसंख्या उभारली होती.
५. गेल्या ७ महिन्यात भारतीय संघ तिसऱ्यांदा आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचलाय. जून २०१७मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा सीनियर संघ फायनलमध्ये पोहोचला होता. त्यानंतर जुलैमध्ये महिला क्रिकेट संघाने वर्ल्डकप फायनलमध्ये जागा मिळवली होती.