मुंबई : टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना (INDvsPAK) म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी मनोरंजन, थरार, रंगत या सर्वाचं कमप्लिट पॅकेज आणि पैसावसूल मॅच. जेव्हा जेव्हा या दोन्ही टीम एकमेकांसमोर उभ्या ठाकतात, तेव्हा तेव्हा क्रिकेट समर्थकांसाठी दिवाळीच असते. टी 20 वर्ल्ड कपच्या निमित्ताने दोन्ही देश 24 ऑक्टोबरला आमनेसामने भिडणार आहेत. विशेष म्हणजे दोन्ही संघ या सामन्यातूनच टी 20 वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात करणार आहेत. दोन्ही संघ जेव्हा आमनेसामने भिडले, तेव्हा तेव्हा मैदानात किंवा मैदानाबाहेर काही न काही राडा झालेलाच आहे. (india vs pakistan 3rd odi 1987 When Ravi Shastri Chased Miandad With a Shoe at Lal Bahadur Shastri Stadium Hyderabad)
जावेद मियाँदाद आणि किरण मोरे यांच्यात झालेली हमरीतुमरी सर्वांनाच माहिती आहे. असाच काहीसा राडा हा टीम इंडियाचे प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू रवी शास्री आणि जावेग मियाँदाद यांच्यात झाला होता. मॅटर इतका झाला होता की, चक्क शास्त्रींनी मियाँदादला टीम इंडियाच्या ड्रेसिंगरुमपासून ते पाकिस्तानच्या ड्रेसिंगरुमपर्यंत हातात बूट घेऊन पळवलं होतं.
नक्की काय झालं होतं?
हा सर्व मॅटर आहे 20 मार्च 1987 रोजीचा. पाकिस्तान भारत दौऱ्यावर होता. पाकिस्तान या दौऱ्यात 5 टेस्ट आणि 6 वनडे खेळणार होता. एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या वनडे सामन्यांच हैदराबादमधील लालबहादूर शास्त्री स्टेडियममध्ये आयोजन करण्यात आलं होतं.
पाकिस्तानने टॉस जिंकला. टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी टीम इंडियाच्या सलामीवीरांना झटपट बाद केलं. मात्र रवी शास्त्री आणि कपिल देव यांच्या अर्धशतकी खेळीने टीम इंडियाचा डाव सावरला. शास्त्रीने 69 तर देव यांनी 59 धावांची खेळी केली. या जोरावर भारताने 44 षटकांमध्ये 6 विकेट्स गमावून 212 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे पाकिस्तानला विजयासाठी 213 धावांचे आव्हान मिळाले.
पाकिस्तान विजयी धावाचं पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला. पाकिस्तानला विजयासाठी 1 बॉलमध्ये 2 धावा हव्या होत्या. पाकिस्तानच्या फलंदाज जोडीने एक धाव पूर्ण केली. मात्र दुसरी धाव पूर्ण करताना अब्दुल कादिर आऊट झाला. त्यामुळे स्कोअर लेव्हल झाला.
..असा लागला निकाल
सामना बरोबरीत सुटला होता. त्यामुळे तेव्हाच्या नियमांनुसार टीम इंडियाला विकेट्सच्या निकषांवर विजयी ठरवण्यात आलं. पाकिस्तानने टीम इंडियाच्या तुलनेत 1 म्हणजेच 7 विकेट्स गमावले होते. याच 1 विकेटमुळे टीम इंडियाने मॅच जिंकली.
टीम इंडियाचा विजय झाल्याने जावेद मियाँदादचा तीळपापड झाला. मियाँदाद संतापला. पराभूत झाल्याने मियाँदाद चिडला होता. ड्रेसिंगरुममध्ये रवी शास्त्री होते. मियाँदाद संतापून टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये शिरला आणि म्हणाला, "तुम्ही चिटींग करुन जिंकला आहात." हे ऐकून शास्त्री संतापले. रागाने लालबूंद झालेल्या शास्त्री बूट घेऊन मियाँदादच्या मागे लागले. शास्त्रींनी मियाँदादला टीम इंडियाच्या ड्रेसिंगरुमपासून ते पाकिस्तानच्या ड्रेसिंगरुमपर्यंत पळवलं.
हा सर्व प्रकार पाहून कॅप्टन इमरान खानने मध्यस्थी केली. त्यानंतर सर्व प्रकरण शांत झालं. शास्त्री आणि मियाँदादनेही नमतं घेतलं. त्यामुळे प्रकरण तिथेच संपलं.
त्यानंतर पुढील सामना हा पुण्यात होता. या सामन्यासाठी दोन्ही संघ पुण्याच्या दिशेने विमानेने निघाले. विमानात दोघांनी एकत्र वेळ घालवला. मात्र त्यानंतर दोघांनी या सर्व प्रकाराचा कुठेही उल्लेख केला नाही.
शास्त्रींनी हा किस्सा त्यांच्या 'स्टारगेजिंग या पुस्तकात सांगितला आहे.