कोलकाता : सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. २३ ऑक्टोबरला गांगुली अध्यक्षपदाची सूत्र हातात घेईल. सोमवारी बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. पण या पदासाठी फक्त एकट्या गांगुलीचाच अर्ज आला, त्यामुळे २३ तारखेला गांगुलीची बिनविरोध निवड होणार आहे.
बीसीसीआयचा अध्यक्ष होताच गांगुलीला भारत-पाकिस्तान द्विपक्षीय सीरिजबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा गांगुलीने याचं उत्तर न देता बॉल सरकारच्या कोर्टात टाकला. भारत-पाकिस्तान सीरिजबाबतचा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही. याची परवानगी केंद्र सरकारला द्यावी लागेल. या दोन्ही देशांमधल्या सीरिजचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानच घेऊ शकतात, असं गांगुलीने सांगितलं.
तणावपूर्ण संबंधांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विदेशीय सीरिज होत नाहीत. हे दोन्ही देश फक्त आयसीसीची स्पर्धा आणि आशिया कपमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात. भारताने पाकिस्तानविरुद्ध शेवटची मॅच वर्ल्ड कपमध्ये खेळली होती.
२००४ सालच्या ऐतिहासिक पाकिस्तान दौऱ्यात सौरव गांगुली भारताचा कर्णधार होता. या दौऱ्यात भारताने वनडे आणि टेस्ट सीरिजमध्ये विजय मिळवला होता. १९९९ सालच्या कारगील युद्धानंतर भारत २००४ साली पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. तसंच तेव्हा १९८९ नंतर भारत पहिल्यांदाच पाकिस्तानला गेला होता.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातली द्विपक्षीय सीरिज २०१२च्या शेवटी झाली होती. २ टी-२० आणि ३ वनडे मॅचच्या दौऱ्यासाठी पाकिस्तानची टीम भारत दौऱ्यावर आली होती.