नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने कसोटी मालिकेची विजयी सुरुवात केली पण हीच कामगिरी भारताला दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये करता आली नाही. त्यामुळे भारताला पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतरसुद्धा भारतीय संघातील खेळा़डूंना आयसीससीच्या सुधारित क्रमवारीत बढती मिळाली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीत केलेल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय खेळाडूंना आयसीसीच्या क्रमावारीत हे स्थान मिळालं आहे. भारताचा कॅप्टन विराट कोहली आणि भारतीय गोलंदाजांनी आयसीसीच्या क्रिकेट क्रमवारीत बढती मिळाली आहे.
आयसीसीने बुधवारी कसोटी क्रिकेटची नवी यादी जाहीर केली. यात मोहम्मद शमीने 2 गुणांच्या बढतीने 21 वा स्थान मिळवलं आहे. शमीचे गुण आता 667 आहेत. त्याने दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात 56 रनांच्या मोबदल्यात 6 विकेट्स घेतल्या होत्या. शमीसोबतच जसप्रीत बुमराहने 28 व्या क्रमांकावर उडी घेतली आहे. बुमराहचे एकूण 591 गुण आहेत. तर इंशात शर्मा 26 व्या क्रमांकावर पोहचला आहे. इंशात शर्माच्या खात्यात 620 गुण आहेत.
बॅट्समनच्या यादीत विराट कोहलीने आपलं पहिलं स्थान अबाधित ठेवलं आहे. विराट कोहली 934 गुणांसह पहिल्या क्रमांकावर जम बसवून आहे. तर त्याच्या खालोखाल केन विलियमसन 915 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजेच विराट कोहली आणि केन विलियमसन यांच्यात 19 गुणांचा फरक आहे.
आयसीसी गोलंदाजांच्या क्रमावारीत ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सनी उत्तम कामगिरी करत पहिल्या 10 मध्ये स्थान मिळवलं आहे. यामध्ये नॅथन लॉयन आणि जोश हेजलवूड यांचा समावेश आहे. या दोन्ही गोलंदाजांनी भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीत भारतीय बॅट्समन्सना हैराण केले होते. दुसऱ्या कसोटीत नॅथन लॉयनने 8 विकेट्स घेतले होते. या कामगिरीच्या जोरावर त्याने 7 वा क्रमांक पटकावलं आहे.