IPL 2019: हैदराबादला निरोप देताना डेव्हिड वॉर्नर भावूक

वॉर्नरने आपल्या इंस्टाग्राम वर एक भावूक पोस्ट लिहीली.

Updated: Apr 30, 2019, 08:18 PM IST
IPL 2019: हैदराबादला निरोप देताना डेव्हिड वॉर्नर भावूक title=

हैदराबाद : पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये हैदराबादचा ४५ रननी विजय झाला. या मॅचमध्ये डेव्हिड वॉर्नरने ५६ बॉलमध्ये ८१ रनची खेळी केली. या खेळीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. पंजाब विरुद्धची ही मॅच वॉर्नरसाठी या पर्वातील शेवटची मॅच होती. त्यामुळे तो आपल्या टीमला आणि सहकाऱ्यांना निरोप देताना भावूक झाल्याचं पाहायला मिळाला. तसेच त्याने हैदराबाद टीमबद्दल असलेल्या आठवणींनाही उजाळा दिला आहे. 

वॉर्नरने आपल्या इंस्टाग्राम वर एक भावूक पोस्ट लिहीली. या पोस्टमध्ये त्याने हैदराबादच्या टीमचे आभार मानले आहेत. मागील वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टेस्ट मॅच दरम्यान बॉलसोबत केलेल्या छेडछाडी प्रकरणी त्याच्यावर वर्षभराची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतरही त्याला हैदराबादकडून समर्थन करण्यात आले होते. यासर्व पाठिंब्यासाठी त्याने आपल्या भावना इंस्टाग्राम द्वारे व्यक्त केल्या आहेत.

 

वॉर्नरने आपल्या सहकाऱ्यांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. टीमने मला दिलेला पाठिंब्याबद्दल मी शब्दात व्यक्त होऊ शकत नाही. असे तो या पोस्टमध्ये म्हणाला. तसेच वेळोवेळी टीमकडून मला चांगल्या प्रकारे समर्थन मिळाले, अशी प्रतिक्रिया वॉर्नरने दिली. 

'ठराविक अंतराने पुनरागमन केल्याने मी आनंदी होतो. खेळाडू, फ्रेंचायजी, इतर सहकाऱ्यांचे मी आभार मानतो. टीममध्ये माझे स्वागत करण्यात आलं. टीमसाठी खेळताना खूप एनजॉय केलं. टीमच्या आयपीएलच्या या पर्वासाठी शुभेच्छा'. असं तो आपल्या पोस्टद्वारे म्हणाला आहे.

वर्ल्ड कप सराव

 क्रिकेट चाहत्यांना वर्ल्ड कप स्पर्धेचे वेध लागले आहेत. आयपीएल संपल्यानंतर काही दिवसांनी वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे.  ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कपच्या टीममध्ये वॉर्नरचा समावेश आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत कोणत्याही प्रकारची उणीव राहू नये यासाठी ऑस्ट्रेलिया टीमकडून २ मे पासून कसून सराव केला जाणार आहे. यासाठी वॉर्नर मायदेशी परतला आहे. याआधी काही खेळाडू आयपीएल स्पर्धा सोडून वर्ल्ड कपच्या सरावासाठी रवाना झाले आहेत.

वॉर्नरची कामगिरी

वर्षभराच्या पुनरागमनानंतर वॉर्नरची बॅट चांगलीच तळपलेली पाहायला मिळाली. वॉर्नरने आयपीएलच्या १२ व्या पर्वात एकूण १२ मॅच खेळल्या. यात त्याने ६९२ रन केल्या. यामध्ये १ शतक आणि ८ अर्धशतक ठोकली होती. यंदाच्या मोसमात डेव्हिड वॉर्नर हा सर्वाधिक रन करणारा खेळाडू बनला आहे.