IPL 2019: विराटवर भडकलेल्या अंपायरने स्टेडियममधला दरवाजा तोडला

क्रिकेटच्या मैदानात खेळाडूंनी भडकून ड्रेसिंग रूममध्ये केलेलं नुकसान आपण अनेक वेळा बघितलं आहे.

Updated: May 7, 2019, 04:13 PM IST
IPL 2019: विराटवर भडकलेल्या अंपायरने स्टेडियममधला दरवाजा तोडला title=

बंगळुरू : क्रिकेटच्या मैदानात खेळाडूंनी भडकून ड्रेसिंग रूममध्ये केलेलं नुकसान आपण अनेक वेळा बघितलं आहे. आयपीएलमध्ये मात्र इंग्लंडचे अंपायर नायजल लाँग यांनी चिडून स्टेडियममधला एक दरवाजा तोडल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे नायजल लाँग यांच्यावर कारवाई होऊ शकते. नायजल लाँग यांचं बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीशी वाद झाला, यानंतर त्यांनी स्टेडियममधला दरवाजा तोडला.

शनिवारी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या मॅचमध्ये बंगळुरूने हैदराबादचा ४ विकेटने पराभव केला होता. या मॅचमध्ये हैदराबादचा कर्णधार केन विलियमसन याने ७० रनची आणि बंगळुरूच्या शेमरन हेटमायरने ७५ रनची खेळी केली होती. या मॅचदरम्यान नो बॉलच्या वादग्रस्त निर्णयानंतर कोहली आणि अंपायर नायजल लाँग यांच्यामध्ये वाद झाले.

या ओव्हरमध्ये उमेश यादवने २८ रन दिले होते, पण नो बॉल आणि त्यानंतरच्या फ्री हिटमध्ये उमेश यादवने फक्त ३ रन दिले. आयसीसीच्या एलिट पॅनलचे अंपायर असलेल्या नायजल लाँग यांनी इनिंग ब्रेक दरम्यान अंपायरच्या खोलीचा दरवाजा जोरजोरात आपटला आणि दरवाजाला नुकसान पोहोचवलं.

अंपायर नायजल लाँग यांना याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागू शकतं, पण त्यांना हैदराबादमध्ये होणाऱ्या आयपीएल फायनलमधून हटवण्यात येणार नाही, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. कर्नाटक क्रिकेट संघाचे सचिव आर. सुधाकर राव म्हणाले, 'अंपायर नायजल लाँग यांनी ५ हजार रुपयांची नुकसान भरपाई दिलेली आहे, आणि याची पावतीही मागितली आहे.'

नायजल लाँग यांनी ५६ टेस्ट, १२३ वनडे आणि ३२ टी-२० आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये अंपायरिंग केली आहे. ३० मेपासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपमध्येही नायजल लाँग अंपायर असतील.