मुंबई: IPLच्या बायो बबलमध्ये कोरोनानं शिरकाव केल्यामुळे IPL 2021 च्या स्पर्धा मध्येच स्थगित कराव्या लागल्या आहेत. स्पर्धा स्थगित झाल्यामुळे काही खेळाडू आपल्या घरी परतले आहेत. तर कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या खेळाडूंवर भारतात सध्या उपचार सुरू आहेत. चेन्नई सुपरकिंग्स संघाचे कोच मात्र पुन्हा एकदा पॉझिटिव्ह सापडल्यानं त्यांना आपल्या घरी परत जाता येणार नाही.
मिळालेल्या माहितीनुसार चेन्नई सुपकिंग्सचे कोच मायकल हस्सी यांची शनिवारी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात आली. दुसरी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना ऑस्ट्रेलियाला आपल्या घरी जाता येणार नाही. हस्सी यांना काही दिवस भारतातच राहावं लागणार आहे. त्यानंतर ते मालदीवमध्ये जातील आणि त्यानंतर आपल्या घरी ऑस्ट्रेलियामध्ये.
बायो बबलमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यामुळे 4 खेळाडू आणि 2 कोच यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. खेळाडूंची सुरक्षा लक्षात घेऊन तत्काळ IPL 2021 स्थगित करण्यात आलं आहे. हे सामने कधी घेतले जाणार याबाबत अद्यापही कोणताही निर्णय झालेला नाही.
ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आणि कोच यांना भारतातून ऑस्ट्रेलियामध्ये जाण्याची परवानगी नसल्यानं ते मालदीवमध्ये पोहोचले आहेत. तिथे क्वारंटाइन काळ संपल्यानंतर ते आपल्या घरी ऑस्ट्रेलियाला परत जाऊ शकणार आहेत. हस्सी यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे ते भारतात क्वारंटाइन राहणार आहेत.