मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या (IPL 2022) पहिल्या सामन्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण आहे. या मोसमातील पहिला सामना हा चेन्नई (CSK) विरुद्ध कोलकाता (KKR) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. तर रविवारपासून (26 मार्च) मोसमातील डबल हेडर सामन्यांना सुरुवात होतेय. (ipl 2022 mi mumbai indians never won their 1st match in ipl after 2013)
या डबल हेडरमधील पहिला सामना हा मुंबई विरुद्ध दिल्ली यांच्यात खेळवण्यात येणार आहे. मुंबई दिल्ली विरुद्धच्या या सामन्याने 15 व्या मोसमातील श्रीगणेशा करणार आहे. मुंबई आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम आहे. मात्र जसा चंद्रावर डाग आहे, तसाच एक डाग हा या यशस्वी टीमवरही आहेत.
त्याचं असंय की 2013 पासून 2021 पर्यंत मुंबईला आपला पहिला सामना जिंकता आलेला नाही. मुंबईची 2013 पासूने ते आतापर्यंत ही आयपीएलमधील सुरुवात ही पराभवानेच झाली आहे.
मुंबईने आयपीएलमधील आपला पहिला सामना हा अखेरीस 2012 मध्ये जिंकला होता. तेव्हा मुंबईने चेन्नईवर 8 विकेट्सने विजय मिळवला होता. विशेष बाब अशी की मुंबईने 2013 पासून आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची सुरुवात केली. यासह पहिला सामन्यात पराभूत होण्याची परंपराही कायम झाली.
त्यामुळे मुंबई यंदाच्या वेळेस दिल्ली विरुद्धचा सामना जिंकून गेल्या 8 वर्षात लागलेला डाग पुसून काढण्याच्या प्रयत्नात असणार आहे. यामुळे मुंबईची पलटण आपला सलामीचा सामना जिंकून 8 वर्षांपासून सुरु असलेली पराभवाची परंपरा मोडून काढते का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.