IPL 2024: कोलकाता संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर सध्या संघाच्या कामगिरीने चांगलाच आनंदी आहे. कोलकाता संघाला आयपीएलच्या या हंगामात चांगली सुरुवात मिळाली असून, आतापर्यंत अपराजित राहिला आहे. श्रेयस अय्यरला गेल्या काही काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. दुखापत, रणजी न खेळण्यावरुन नाराजी, बीसीसीआय करारातून वगळणं अशा अनेक समस्यांना त्याला तोंड द्यावं लागलं आहे. पण हे सर्व मागे टाकत श्रेयस अय्यर आता नव्या दमाने मैदानात खेळताना दिसत आहे. नुकतीच श्रेयस अय्यरने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मासह 'कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावली.
'कपिल शर्मा शो'मध्ये श्रेयस अय्यरने अनेक प्रश्नांची उत्तरं देत काही खुलासेही केले. कपिल शर्माने म्हटलं की, जेव्हा कधी श्रेयस अय्यर चौकार लगावतो तेव्हा कॅमेरामन 'श्रेयस माझ्याशी लग्न कर' असं पोस्ट हातात घेऊन उभ्या मुलींना दाखवतो. यावेळी कपिलने श्रेयस अद्याप बॅचलर आहे असंही म्हटलं. यावेळी कपिल शर्माने श्रेयस अय्यरला, तू नंतर कॅमेरामनला त्या मुली कुठे बसल्या आहेत याची चौकशी करतोस का? असं विचारलं.
त्यावर श्रेयसने उत्तर दिलं की, "माझ्या पहिल्या आयपीएलमध्ये मी एका सुंदर मुलीला स्टँडमध्ये बसलेलं पाहिलं. मी तिला हातही दाखवला. हे फार वर्षांपूर्वी झालं होतं. त्यावेळी फेसबुक फार प्रसिद्ध होतं. मला ती मेसेज पाठवेल असं वाटत होतं. मी सतत मेसेज चेक करत होतो. ही एकच घटना माझ्यासह झाली आहे".
यावेळी रोहित शर्माला 2023 वर्ल्डकपमधील पराभवाबद्दल विचारण्यात आलं. त्यावर त्याने सांगितलं की, "सामना सुरू झाला तेव्हा आमची सुरुवात चांगली झाली. शुभमन गिल लगेच बाद झाला. पण नंतर विराट कोहली आणि माझी भागीदारी झाली. आम्ही चांगली धावसंख्या गाठू शकू असा आम्हाला विश्वास होता. मला असं वाटते की मोठ्या सामन्यांमध्ये जर तुम्ही धावा करू शकता आणि विरुद्ध संघावर दबाव निर्माण करू शकता... कारण विरुद्ध संघाला धावा कराव्या लागतात. पण ऑस्ट्रेलियाने चांगले क्रिकेट खेळले. आम्ही फक्त 40 धावांत तीन विकेट्स घेण्यास यशस्वी झालो, पण त्यांच्यात दीर्घ भागीदारी होती”.
कपिल शर्माने यावेळी श्रेयस अय्यरला लहानपणासून तुझा आदर्श असणारा खेळाडू कोण असं विचारलं असता त्याने रोहित शर्मा असं उत्तर दिलं. रोहित लहानपणापासूनच माझा आदर्श आहे आणि त्याला पाहून फार काही शिकल्याचं त्याने म्हटलं.
"मी जोक मारत नाही आहे किंवा त्याला मस्काही मारत नाही आहे. रोहित भाई लहानपणासून माझा आदर्श आहे. कारण तो मुंबईचा आहे आणि मीदेखील. त्याला पाहूनच लहानाचा मोठा झालो आहे," असं श्रेयसने सांगितलं. रोहितने यावर हे तरुण खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये मागून वाईट बोलतात असं उपहासात्मकपणे म्हटलं. "ड्रेसिंग रुममध्ये फार शिव्या देतात. आता समोर कॅमेरा आहे. हे आजकालचे तरुण खेळाडू फार धोकादायक आहेत," असं रोहित म्हणाला.