Ganguly On Duo To Open For India At T20 World Cup: दिल्ली कॅपिटल्सच्या डायरेक्टरपदावर असलेला भारताचा माजी कर्णधार तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने टी-20 विश्वचषकासंदर्भात एक महत्त्वाचं विधान केलं आहे. 26 मे रोजी होणाऱ्या इंडियन प्रिमिअर लिगच्या फायनलनंतर काही दिवसांमध्ये म्हणजेच 5 जून रोजी टी-20 विश्वचषक स्पर्धा सुरु होत आहे. यंदा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय संघांने आक्रमक भूमिका घ्यावी असं मत गांगुलीने व्यक्त केलं आहे. यासंदर्भात बोलताना गांगुलीने विराट कोहलीचं तोंडभरुन कौतुक केलं. त्याने विराट कोहली 40 बॉलमध्ये शतक झळकावू शकतो असं म्हटलं आहे. तसेच गांगुलीने आक्रमक पवित्रा घ्यावा म्हणजे काय करावं यासंदर्भातही भाष्य केलं आहे.
दिल्लीमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सौरव गांगुलीने, "भारतासाठी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सर्वात मोठी बाब असणार आहे ती म्हणजे न घाबरता क्रिकेट खेळणं. टी-20 मध्ये तरुण खेळाडूच खेळतात असा काही नियम नाही. जेम्स अँण्डरसन अजूनही कसोटी क्रिकेट खेळतो. तो कसोटीमध्ये 30 ओव्हर गोलंदाजी करतो. एम. एस. धोनी अजूनही लांबच लांब षटकार लगावतो. हे दोघेही वयाच्या चाळीशीत आहेत. षटकार लगावणं हे महत्त्वाचं असतं. विराटकडे 40 बॉलमध्ये शतक लगावण्याची क्षमता आहे. न घाबरता आणि मुक्तपणे टी-20 क्रिकेट खेळणं महत्त्वाचं आहे," असं म्हटलं. "भारताने मैदानावर उतरुन आक्रमक खेळ करावा. रोहित, विराट, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या यासारख्या खेळाडूंकडे उत्तम टॅलेंट आहे. त्यांची षटकार लगावण्याची क्षमता ही प्रचंड आहे," असंही गांगुली म्हणाला.
निवड समिती, प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्माने संघाच्या हिताच्या दृष्टीने योग्य निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा गांगुलीने व्यक्त केली. टी-20 विश्वचषकामध्ये कोणत्या जोडगोळीने सलामीला यावं यासंदर्भातही गांगुलीने विधान केलं आहे. सध्या यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल यासारख्या खेळाडूंच्या नावाची चर्चा सुरु असताना गांगुलीने मात्र वेगळ्याच नावांना पसंती दिली आहे. "तुम्ही मला माझं खासगी मत विचारलं तर निवड समितीने असा निर्णय घ्यावाच असं माझं मत नाही कारण शेवटी तो त्यांचा निर्णय असेल की कोणाला निवडावं. पण मला वाटतं की रोहित आणि विराटने सलामीला यावं," असं गांगुली म्हणाला. यशस्वी जयस्वालने मुंबईविरुद्धच्या सामन्यामध्ये दमदार शतक झळकावलं आहे. मात्र इंग्लंडविरुद्धच्या कसोटीनंतर टी-20 विश्वचषकाच्या संभाव्य संघातून यशस्वीचं नाव वगळण्यात आलं आहे का यासंदर्भात गांगुलीला विचारलं असता त्याने, "मला नाही वाटतं यशस्वीचं नाव वगळण्यात आलं आहे. तो फार खास खेळाडू आहे," असं उत्तर दिलं. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर त्याची निवड केली जाऊ नये असं गांगुली म्हणाला.
नक्की वाचा >> SRH विरुद्धच्या पराभवाबद्दल बोलताना पंतने मान खाली घातली! गावस्कर म्हणाले, 'तू कधीच शरमेनं..'
अनुभवी खेळाडू आणि तरुण खेळाडू असा योग्य समतोल संघामध्ये हवा असं मत गांगुलीने व्यक्त केला आहे. "तरुण आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल संघात हवा. तुम्ही सर्व कामगिरी पाहिली पाहिजे. भारताकडे फार अनुभवी खेळाडू आहेत. मागील काही वर्षांमध्ये त्यांनी दमदार कामगिरी केली आहे," असं गांगुली म्हणाला.