Champions Trophy 2025 : बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये (Border Gavaskar Trophy) ऑस्ट्रेलिया विरुद्ध दारुण पराभव झाल्यावर आता टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध टी 20 आणि वनडे सीरिज खेळणार आहे. घरच्या मैदानावर ही सीरिज खेळल्यावर टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) खेळण्यासाठी उतरायचे आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान पाकिस्तानात खेळवण्यात येईल. तर चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताचे सर्व सामने हे दुबईत होतील. रोहित शर्मा हाच 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा कर्णधार असेल याची घोषणा भारताने 2024 वर्ल्ड कप जिंकल्यावरच करण्यात आली होती. मात्र आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा उपकर्णधार कोण असणार याच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार कोण असेल याबाबत जोरदार चर्चा आहे. T20 वर्ल्ड कपनंतर शुभमन गिलचा भारताच्या लीडरशिप ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आणि त्याला व्हाईट बॉल संघांचा उपकर्णधार बनवण्यात आले. हार्दिक पंड्या हा वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार होता.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या वनडे संघात महत्वपूर्ण बदल केले जाऊ शकतात. टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह 2025 मध्ये भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघाचा उपकर्णधार असेल. 2022 मध्ये साऊथ आफ्रिके विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये बुमराह टीम इंडियाचा उपकर्णधार होता, तर 2023 मध्ये आयर्लंड विरुद्धच्या टी 20 सीरिजमध्ये त्याने भारताचे नेतृत्व सुद्धा केले आहे.
Jasprit Bumrah set to be the Vice Captain in the 2025 Champions Trophy. (Sahil Malhotra). pic.twitter.com/X6ZbakH6Rc
— Mufaddal Vohra (mufaddal_vohra) January 6, 2025
बुमराहने नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पर्थ आणि सिडनी टेस्ट सामन्यात देखील टीम इंडियाचे नेतृत्व केले. 12 जानेवारी पूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणाऱ्या सर्व देशांना त्यांचे क्रिकेट संघ जाहीर करायचे आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा होऊ शकते. बुमराहला आगामी इंग्लंड विरुद्ध सीरिजमधून आराम दिला जाऊ शकतो.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत पर्थ आणि सिडनी टेस्टमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणारा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला त्याच्या परफॉर्मन्ससाठी प्लेअर ऑफ द सीरिजच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. बुमराहने 5 सामन्यांच्या या सीरिजमध्ये तब्बल 32 विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहने या सीरिजमध्ये त्याच्या गोलंदाजीचा जबरदस्त परफॉर्मन्स दिला. यासह त्याने भारताचे कर्णधारपद देखील सांभाळले.