कोलंबो : आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं देशात पुन्हा पुनरागमन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेच्या १० खेळाडूंनी पाकिस्तानचा दौरा करायला नकार दिला आहे. या महिन्यामध्ये पाकिस्तानचा दौरा नियोजित होता. या कार्यक्रमानुसार दोन्ही टीम ३ टी-२० आणि ३ वनडे मॅचची सीरिज खेळणार आहेत.
पाकिस्तान आणि श्रीलंकेमधली ही सीरिज २७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पण कर्णधार दिमुथ करुणारत्ने, लसिथ मलिंगा आणि एंजलो मॅथ्यूज यांच्यासारख्या १० प्रमुख खेळाडूंना पाकिस्तानमध्ये जाणार नाही, असं सांगितलं आहे.
२००९ साली पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंकेच्या टीमवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात श्रीलंकेचे खेळाडू थोडक्यात बचावले होते. तेव्हापासून कोणत्याच टीमने पाकिस्तानमध्ये जाऊन पूर्ण दौरा केला नाही. श्रीलंकेने २०१७ साली पाकिस्तानमध्ये टी-२० मॅच खेळली होती, पण त्यावेळीही प्रमुख खेळाडूंनी माघार घेतली होती.
दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली, तरी त्यांचे अधिकारी चिंतेत आहेत. पीसीबीचे अधिकारी श्रीलंका क्रिकेटचे अधिकारी आणि क्रीडा मंत्री हरिन फर्नांडोसोबत संपर्कात आहेत.
श्रीलंकेसोबत वनडे आणि टी-२० सीरिजचं आयोजन करुन पाकिस्तान सुरक्षित असल्याचा संदेश द्यायचा आहे. यासाठी पाकिस्तानकडून हे प्रयत्न सुरु आहेत. क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार दिमुथ करुणारत्ने, लसिथ मलिंगा, एंजलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुसल परेरा, धनंजय डिसिल्वा, थिसारा परेरा, अकिला धनंजया, सुरंगा लकमल, दिनेश चंडीमल यांनी पाकिस्तानमध्ये जायला नकार दिला आहे.