Sapna Gill Molestation: क्रिकेट विश्वात काही महिन्यांपूर्वी भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉविरोधात (Prithvi Shaw) झालेल्या आरोपांनंतर खळबळ उडाली होती. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सपना गिलने (Sapna Gill) पोलीस ठाण्यात पृथ्वी शॉविरोधात विनयभंगाची तक्रार केली होती. तिने पृथ्वी शॉवर फार गंभीर आरोप केले होते. दरम्यान याप्रकरणी सोमवारी पोलीस अधिकारी अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टात (Andheri Magistrate Court) हजर झाला होता. यावेळी अधिकाऱ्याने सपना गिलने पृथ्वी शॉविरोधात केलेले सर्व आरोप खोटे असल्याचं सांगितलं.
पृथ्वी शॉविरोधात केलेल्या तक्रारीनंतर मुंबई एअरपोर्ट पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यास नकार दिल्यानंतर सपना गिलने मॅजिस्ट्रेट कोर्टात धाव घेतली होती. सपना गिलने आपले वकील अली काशीफ खान यांच्या माध्यमातून अंधेरी कोर्टात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती. यानंतर कोर्टाने पोलिसांना याप्रकरणी रिपोर्ट सादर करण्याचा आदेश दिला होता.
पोलिसांनी आपला रिपोर्ट सादर केल्यानंतर अली काशीफ खान यांनी कोर्टाकडे सपना गिलच्या मित्राने व्हिडीओत भांडणाचा रेकॉर्ड केलेला व्हिडीओ सादर करु देण्याची विनंती केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तसंच पबच्या बाहेर असणाऱ्या सीसीटीव्हीमधील फोटोही त्यांनी मागितला होता. कोर्टाने याप्रकरणी पोलिसांना संपूर्ण घटनेचं फुटेज सादर करत प्रकरण 28 जूनपर्यंत पुढे ढकललं होतं.
सपना गिलने अंधेरी न्यायदंडाधिकारी कोर्टात आयपीसी कलम 354 (महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्यावर प्राणघातक हल्ला किंवा बळजबरी करणे), 509 (विनयभंगाच्या हेतून शब्द, हावभाव) आणि 324 (स्वेच्छेने धोकादायक शस्त्रे किंवा साधनांनी दुखापत करणे) या आरोपांतर्गत पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र आशिष यादव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. दोघांनी बॅटने हल्ला केल्याचा तिचा आरोप होता.
पोलिसांनी कोर्टात सांगितलं की, पबमधील सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता सपना गिल आणि तिचा मित्र शोबित ठाकूर यांनी मद्यपान केलं होतं आणि डान्स करत करत होते. शोबित ठाकूरला मोबाइलमध्ये पृथ्वी शॉचा व्हिडीओ रेकॉर्ड करायचा होता. पण पृथ्वीने त्याला थांबवलं होतं. सर्व फुटेज पाहिलं असता पृथ्वी किंवा इतर कोणीही सपना गिलचा विनयभंग केल्याचं अजिबात दिसत नाही.
ही घटना घडली तेव्हा पबमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्वांचे जबाब नोंदवले आहेत. त्यांच्यातील कोणीही सपना गिलने चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यात आल्याचं सांगितलेलं नाही अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी सांगितल्यानुसार, त्यांनी एअर ट्राफिक कंट्रोलचंही सीसीटीव्ही फुटेज तपासलं आहे. यानुसार सपना गिल हातात बेसबॉल बॅट घेऊन पृथ्वीच्या गाडीचा पाठलाग करत होता. तिने पृथ्वीच्या गाडीची काच फोडल्याचंही सीसीटीव्हीत कैद झालं आहे.
पोलिसांनी सीआयएसफच्या अधिकाऱ्यांचेही जबाब नोंदवले आहेत. त्यांनीही सपना गिल दावा करत आहे तसा कोणताही प्रकार घडला नसल्याचं सांगितलं आहे.
सीआयएसएफच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना परिसरात हाणामारी झाल्याची सूचना देण्यात आली होती. घटनास्थळी पोहोचल्यावर कारची काच फुटलेली दिसली. चौकशी केल्यावर, कारच्या ड्रायव्हरने सांगितले की पबमध्ये वाद झाला आणि मॅनेजरने त्यांना जाण्यास सांगितले.
अधिकाऱ्यांनी यावेळी महिलेच्या हातात बेसबॉल बॅट होती असं सांगितलं. पोलीस घटनास्थळी येत असल्याचं दिसताच तिच्या मित्राने बॅट हातातून काढून घेतली आणि फेकून दिली. घटनास्थळी उपस्थित कोणताही पुरुष महिलेशी असभ्य वर्तन करत नव्हता असं पोलिसांनी सीआयएसएफ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितलं आहे.
या सर्व आधारे पोलिसांनी सपना गिलने पृथ्वी शॉविरोधात केलेले आरोप खोटे असल्याचं कोर्टात सांगितलं आहे.
फेब्रुवारी महिन्यात सेल्फी काढण्यावरुन झालेल्या वादानंतर भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सपना गिलविरोधात (Sapna Gill) पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. यानंतर तिच्याविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली होती. पण जामीन मिळाल्यानंतर सपना गिलने पृथ्वी शॉविरोधात विनयभंगाची तक्रार केली होती.