आयपीएल अनेक नवोदित क्रिकेटपटूंसाठी वरदान ठरलं आहे. अत्यंत हालाखीत जगत क्रिकेटर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूंसाठी ही स्पर्धा नशीब बदलणारी ठरली आहे. अनेक खेळाडू रातोरात प्रसिद्ध झाले असून, काहींसाठी तर भारतीय क्रिकेट संघाचे दरवाजे खुले झाले आहेत. नागपूरच्या शुभम दुबेकडे तर 10 वर्षांपूर्वी ग्वोव्ह्ज खरेदी करु शकेल इतकेही पैसे नव्हते. वडिलांचं पान-टपरीचं दुकान असल्याने शुभम दुबेच्या कुटुंबाला संघर्ष करावा लागला होता. पण मंगळवारी शुभम दुबेचं नशीबच पालटलं असून, कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
शुभम दुबे रातोरात करोडपती झाला आहे. राजस्थान रॉयल्सने शुभम दुबेला 5.8 कोटींमध्ये विकत घेतलं आहे. यामुळे शुभम दुबे सध्या चर्चेत आला आहे. 27 वर्षाच्या शुभमने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत जबरदस्त कामगिरी केली होती.
शुभम दुबे आणि त्यांच्या कुटुंबाचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे. आपला आनंद मांडण्यासाठी त्यांच्याकडे शब्द नाहीत. 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना शुभम दुबेने सांगितलं की, "मला तर हे स्वप्नच पाठवत आहे. मी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये चांगला खेळलो होतो. यामुळेच मला या लिलावात निवड होण्याची अपेक्षा होती. पण खरं सांगायचं तर इतकी मोठी रक्कम मिळेल याची अपेक्षा नव्हती". मंगळवारी संध्याकाळी कमल चौकातील दुबे कुटुंबाच्या घराबाहेर शुभेच्छा देणाऱ्यांची रांग लागली होती.
शुभमने सात सामन्यांमध्ये जबरदस्त फलंदाजी केली होती. त्याने 187.28 च्या स्ट्राइक रेटने आणि 73.76 च्या सरासरीने एकूण 222 धावा केल्या. त्याने सात डावात 10 चौकार आणि 18 षटकार मारले. विदर्भासाठी सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रमही शुभमच्या नावावर आहे. बंगालविरुद्ध त्याने अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. एसएमटीच्या सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करतानाही शुभम नाबाद राहिला आणि त्याने फक्त 20 चेंडूत 58 धावा केल्या. त्याच्या खेळीत 3 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. हा स्ट्राईक रेट स्वप्नवत होता. त्याचा स्ट्राइक रेट 290 होता.