नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा त्याच्या धमाकेदार बॅटींगसाठी जगभरात लोकप्रिय आहे. भलेही भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामने होत नाहीत, पण त्याच्या फॅन्सची पाकिस्तानातही काही कमतरता नाही.
मग तो क्रिकेटर शाहिद आफ्रिदी असो, वसीम अकरम असो किंवा शोएब अख्तर असो. विराट कोहलीचा पाकिस्तानातील आणखी एक फॅन आता समोर आला आहे. विराटच्या या फॅनची ईच्छा आहे की, त्याने पाकिस्तान सुपर लीगमध्ये त्याच्या टीमकडून खेळावं. अर्थातच विराट ज्या टीमकडून खेळेल, त्या टीमची बॅटींग मजबूत होणार. यासोबतच विराटच्या रणनितीचाही टीमला फायदा होईल.
पाकिस्तान सुपर लीगमधील डरबन कलंदर्स टीमचा मालक फवाद राणाने हिंदुस्थान टाईम्स सोबत बोलताना ही ईच्छा जाहीर केली. राणा म्हणाला की, ‘जर भारतीय क्रिकेट बोर्डाने परवानगी दिली तर त्याला टीम इंडियाच्या कर्णधाराला त्याच्या टीममध्ये सामिल करून घेण्याची ईच्छा आहे’.
फवाद राणाची ही ईच्छा पूर्ण होणार नाही. कारण बीसीसीआयने आयपीएलच्या व्यतिरीक्त कोणत्याही टी-२० लीगमध्ये खेळण्याची मनाई भारतीय खेळाडूंवर करण्यात आली आहे. त्यासोबत पाकिस्तानकडून होत असलेल्या दहशतवादामुळेही भारत सरकार टीम इंडियाच्या खेळाडूंना याची परवानगी देणार नाही. तशी ही बाब फवादलाही माहिती आहे.
आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंच्या खेळण्यावर बीसीसीआयने बंदी घातली आहे. सुरूवातीच्या काही सामन्यांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंनी यात सहभाग घेतला होता.