लंडन : भारत आणि इंग्लंडमधल्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला १ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पण या टेस्ट सीरिजआधी कर्णधार विराट कोहलीची चिंता वाढली आहे. भारताचा भरवशाचा बॅट्समन चेतेश्वर पुजाराचा फॉर्म आणि त्याची आत्तापर्यंतची इंग्लंडमधील कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. टेस्ट सीरिजआधी भारत आणि इसेक्समधल्या मॅचमध्येही पुजाराला स्वस्तात बाद झाला. फक्त ७ बॉल खेळून पुजारा माघारी परतला.
याआधी काऊंटी खेळण्यासाठी पुजारा इंग्लंडमध्ये होता. पण काऊंटी क्रिकेटमध्येही पुजाराला चमकदार कामगिरी करता आलेली नाही. भारताच्या मागच्या इंग्लंड दौऱ्यातही पुजारा टीममध्ये होता. पण त्या दौऱ्यात पुजारानं ५ टेस्ट मॅचमध्ये २२.२० च्या सरासरीनं फक्त २२२ रन बनवले. यामध्ये एकाही शतकाचा समावेश नव्हता. यातला त्याचा सर्वाधिक स्कोअर ५५ रन होता.
इंग्लंडमध्ये पुजाराला संघर्ष करावा लागला असला तरी त्याचं टेस्ट क्रिकेटमधलं रेकॉर्ड चांगलं आहे. पुजारानं ५८ टेस्ट मॅचच्या ९७ इनिंगमध्ये पुजारानं १४ शतकं आणि १७ अर्धशतकांसोबत ५०.३४ च्या सरासरीनं ४,५३१ रन केले आहेत. पुजारा संथ गतीनं खेळतो असे आरोपही पुजारावर केले जातात. टेस्ट क्रिकेटमध्ये पुजाराचा स्ट्राईक रेट ४७.५५ आहे.
परदेशामध्ये पुजाराचं रेकॉर्ड खराब आहे. २४ मॅचच्या ४१ इनिंगमध्ये पुजारानं ३५.२५ च्या सरासरीनं १४१० रन केले. यामध्ये ४ शतकं आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. पुजारानं यातली ३ शतकं ही श्रीलंकेमध्ये तर एक शतक दक्षिण आफ्रिकेमध्ये केली आहेत.