मुंबई: कोणाला रात्री झोपेत बडबडायची सवय असते तर कोणाला उठून फेऱ्या मारयची. टीम इंडियाच्या एका दिग्गज खेळाडूला रात्री उठून झोपेत चालायची आणि त्यानंतर पहाटे 2 वाजता सराव करायची सवय होती. त्याचा अजब किस्सा टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एका मुलाखती दरम्यान शेअर केला होता.
'सचिन तेंडुलकरचे मध्ये मध्ये जेव्हा रन होत नव्हते तेव्हा तो बॅट शोधायचा. त्याला माझी बॅट आवडायची. मी देखील वजनाला जड असलेला बॅटने खेळायचो त्यामुळे सचिन माझ्या बॅट वापरायचा. 1992 सालात सिडनी दौऱ्यावर असताना सचिन तेंडुलकर आणि मी आम्ही रूम पार्टनर होतो. मला खेळण्याची संधी मिळाली नव्हती.'
सचिनला कसोटी सामना खेळायचा होता. सुरुवातीच्या दोन सामन्यात त्याचे रन झाले नाहीत. दुसऱ्या दिवशी सामना होता. तर सचिनला अचानक 2 वाजता जाग आली. त्याने पहाटे उठून सराव सुरू केला. मी सचिनला म्हटलं की झोप तुला उद्या खेळायचं आहे.
'दुसऱ्या दिवशी सचिननं मला सांगितलं मला जेव्हा झोप येईल तेव्हा मी झोपेन. माझा नंबर यायच्या आधी मला उठव. त्यावर मी त्याच्या शेजारी बसून होतो की चुकून विकेट पडली आणि त्याचा नंबर आला तर.त्यानंतर सचिननं सिडनीमध्ये शतकी खेळी केली होती.'
याशिवाय सचिनला रात्री झोपेत चालायची देखील सवय होती. खूपदा रात्री उशिरा तो उठून फेऱ्या मारत असायचा. सचिनचा रात्रीचा सराव देखील गांगुली यांनी पाहिला आहे. सचिन त्यांची बॅट घेऊन खेळायचे, सराव देखील करायचे कारण सचिन आणि सौरव यांची बॅट वजनाला जवळपास सारखीच होती.