Sports Award : भारतीय क्रिकेट बोर्डाने भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या (Mohammad Shami) नावाची अर्जुन पुरस्कारासाठी (Arjun Award) शिफारस केली आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत शमीने भेदक गोलंदाजी केली होती. या स्पर्धेत अवघ्या सात सामन्यात शमीने 24 विकेट घेतल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या पुरस्कारांच्या यादीत मोहम्मद शमीचं नाव नव्हतं. पण बीसीसीआयने (BCCI) विशेष शिफारस करत शमीचं नाव दिलं आहे. 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा मोहम्मद शमी भारतासाठी 64 कसोटी, 101 एकदिवसीय आणि 23 टी20 सामने खेळला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये शमीने 229 विकेट घेतल्यात आहते. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 195 आणि टी20 क्रिकेटमध्ये 24 विकेट त्याच्या नावावर आहेत. विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तब्बल 7 विकेट घेण्याची कामगिरी त्याने केली होती.
खेलरत्नसाठी युवा खेळाडूंचं नामांकन
क्रीडा क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या मेजर ध्यानचंद खेलर रत्न पुरस्कारासाठी भारताचे अव्वल बॅडमिंटनपटू सात्विक राईराज रंकीरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) या जोडीची शिफारस करण्यात आली आहे. या जोडीने यावर्षी एशियन गेम्समध्ये सुपर्णपदक पटकावलं होतं. तर गेल्या वर्षी झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्येही सुवर्णपदकाची कमाई केली होती. बॅडमिंटन जागतिक क्रमवारीत सात्विक राईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी अव्वल स्थानावर आहे. त्यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांची खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आलं आहे.
अर्जुन पुरस्कारासाठी 17 खेळाडूंचं नामांकन
मोहम्मद शमीशिवाय आणखी 16 खेळाडूंचं अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आलं आहे. यात पुरुष हॉकी खेळाडू कृष्ण बहादूर पाठक आणि सुशीला चानू, तीरंदाज ओजस प्रवीण देवताळे आणि आदिती गोपीचंद स्वामी, बॉक्सर मोहम्मद हुसामुद्दीन, बुद्धीबळपटू आर वैशाली, गोल्फपटू दीक्षा डागर, नेमबाज ऐश्वर्या प्रताप सिंह तोमर, कुस्तीपटू अंतिम पंघाल आणि पॅडलर अयहिका मुखर्जी या खेळाडूंचा समावेश आहे.
द्रोणाचार्य पुरस्कारासाठी नामांकन
द्रोणाचार्य पुरस्कारासाठी पाच प्रशिक्षकांचं नामांकन करण्यात आलं आहे. यात गणेश प्रभाकरन (मल्लखांब), हावीर सैनी (पॅरा अॅथलेटिक्स), ललित कुमार (कुस्ती), आरबी रमेश (बुद्धीबळ) आणि शिवेंद्र सिंह (हॉकी) यांचा समावेश आहे. कविता (कबड्डी), मंजूषा कंवर (बॅडमिंटन) आणि विनीत कुमार शर्मा (हॉकी) यांचं ध्यानचंद लाइफटाइम पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आलं आहे.