मुंबई : पीटीआय पक्षाचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होणार आहेत. पाकिस्तानमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये इम्रान खान यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. इम्रान खान यांनी शपथविधीसाठी भारतातल्या काही सेलिब्रिटींना बोलावलं आहे. यामध्ये कपिल देव, सुनिल गावसकर आणि आमिर खान यांचा समावेश आहे. इम्रान खान याच्या आमंत्रणावर सुनिल गावसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इम्रानच्या शपथविधी सोहळ्याला जाण्याआधी मी भारत सरकारचा सल्ला घेईन. याबद्दल मी भारत सरकारची परवानगी घेईन. माझ्याकडे वेळ असला तरी मी याबद्दल भारत सरकारचा विचार जाणू इच्छितो, असं गावसकर म्हणाले आहेत.
इम्रान खान यांच्याकडून मला आमंत्रण पत्रिका मिळाली आहे. इम्रान खानचं कार्यालय आणि त्यांच्या पक्षाकडून मला आमंत्रण आलं आहे पण हे अधिकृत आमंत्रण नाही. मला जायला आवडेल पण हे माझ्यासाठी शक्य आहे का नाही ते पाहावं लागेल, असं वक्तव्य गावसकर यांनी केलं आहे.
इम्रानच्या शपथविधीची तारीख अजूनही ठरलेली नाही. लॉर्ड्सवर होणाऱ्या भारत आणि इंग्लंडच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये मी कॉमेंट्री करणार आहे. १५ ऑगस्टला शपथविधी असेल तर मी जाऊ शकणार नाही कारण हा भारताचा स्वातंत्र्य दिन आहे तसंच माझ्या आईचा वाढदिवसही आहे. याच दिवशी संध्याकाळी मी पुन्हा इंग्लंडला रवाना होणार आहे, असं गावसकर म्हणाले. भारत आणि इंग्लंडमध्ये ९ ऑगस्टपासून दुसऱ्या टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे.