मुंबई : अंडर-19 आशिया कपच्या सामन्यात आज भारतीय क्रिकेट संघाची सुरुवात खराब झाली. भारताचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या पाकिस्तानी संघाविरुद्ध भारताला पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 50 षटकांच्या या सामन्यात पाकिस्तानने 2 गडी राखून विजय मिळवला. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला.
पाकिस्तानी संघाला शेवटच्या षटकात विजयासाठी 8 धावा करायच्या होत्या आणि त्यांच्या फक्त दोन विकेट शिल्लक होत्या. शेवटच्या चेंडूवर चौकार मारून सामना आपल्या नावावर केला. भारतीय संघाचा या स्पर्धेतील हा पहिलाच पराभव आहे. त्याने पहिल्याच सामन्यात यूएईचा पराभव केला. भारतीय संघ 27 डिसेंबर रोजी गट फेरीतील शेवटचा सामना अफगाणिस्तानशी खेळणार आहे.
आशिया कप 2021 मध्ये पाकिस्तानच्या अंडर-19 संघाविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया 237 धावांवर ऑलआऊट झाली. पाकिस्तानच्या झीशान जमीरने पाच बळी घेतले. भारताकडून यष्टिरक्षक फलंदाज आराध्या यादवने 83 चेंडूत 50 धावा केल्या. याशिवाय सलामीवीर हरनूर सिंगने 46 धावा केल्या.
अंडर-19 आशिया चषक स्पर्धेतील अ गटातील सामन्यादरम्यान पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते.
भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. यश ढालच्या नेतृत्वाखालील संघाने अवघ्या 14 धावांत तीन विकेट गमावल्या. सलामीवीर अंगक्रिश रुघुवंशीला खातेही उघडता आले नाही. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला राज बावा 25 धावा करून बाद झाला.
सातव्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेल्या आराध्या यादवने अर्धशतक झळकावत संघाला बिकट परिस्थितीतून बाहेर काढण्याचा निश्चितच प्रयत्न केला. भारताचा निम्मा संघ 96 धावांत ऑलआऊट झाला. खालच्या फळीतील फलंदाजांनी निश्चितपणे भारताची लाज वाचवण्याचा प्रयत्न केला.
आठव्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेल्या कौशल तांबेने 32 आणि 10व्या क्रमांकावर आलेल्या फलंदाज राजवर्धनने 33 धावा करत संघाला 200 च्या पुढे नेले. मात्र, भारताचा संघ पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही आणि 49व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर सर्वबाद झाला.