भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) खासगी आयुष्यासंदर्भात चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. विराट कोहली मैदानाबाहेर नेमकं काय करतो यापासून ते त्याची कमाई इथपर्यंत अनेक गोष्टींवर त्याचे चाहते चर्चा करत असतात. दुसरीकडे विराट कोहलीही सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत चाहत्यांना अपडेट करत असतो. पण सध्या एक पोस्ट व्हायरल झाली आहे, ज्यावर विराट कोहलीने स्पष्टीकरण दिलं असून ही बातमी खोटी असल्याचं सांगितं आहे. नेमकं असं काय झालं होतं, हे जाणून घ्या...
विराट कोहलीच्या इन्स्टाग्रामवरील कमाईसंदर्भात सोश मीडिया मार्केटिंग सोल्यूसन्स प्लॅटफॉर्म Hopper HQ ने एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी कोहली इंस्टाग्रामवरील तिसरा सर्वात श्रीमंत खेळाडू आहे आणि जगातील शीर्ष 25 व्यक्तींमध्ये तो एकमेव भारतीय आहे.
इंस्टाग्रामवरील श्रीमंतांच्या यादीनुसार, विराट कोहलीला प्रत्येक पोस्टसाठी 11 कोटी 45 लाख रुपये मिळतात. यानंतर सोशल मीडियावर विराट कोहलीच्या कमाईसंदर्भातील चर्चा रंगली होती. पण विराट कोहलीने ट्विट करत ही माहिती खरी नसल्याचं सांगितलं आहे.
विराट कोहलीने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "मला आयुष्यात मिळालेल्या सर्व गोष्टींबद्दल मी कृतज्ञ आणि ऋणी असलो तरी, माझ्या सोशल मीडियाच्या कमाईबद्दल ज्या बातम्या येत आहेत त्या खर्या नाहीत". विराट कोहलीच्या या ट्विटमुळे त्याच्या कमाईसंबंधीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
While I am grateful and indebted to all that I’ve received in life, the news that has been making rounds about my social media earnings is not true.
— Virat Kohli (@imVkohli) August 12, 2023
भारतीय क्रिकेट संघ सध्या 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळत असून, विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. आशिया कप 2023 मध्ये विराट कोहली पुन्हा एकदा संघात सहभागी होणार आहे. पुढील महिन्यात श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये आशिया कप स्पर्धा पार पडणार आहे.
टी-20 मालिकेआधी वेस्ट इंडिजविरोधात झालेल्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत मात्र विराट कोहली सहभागी झाला होता. एकदिवसीय मालिकेत पहिल्या सामन्यात खेळल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात मात्र त्याला विश्रांती देण्यात आली होती.
विराट कोहलीला सध्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. विराट कोहलीने 13 हजार धावा पूर्ण केल्यास सर्वाधिक वेगाने इतक्या धावा करण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावे होईल. दरम्यान 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकपला सुरुवात होत असून, त्यात विराट कोहलीची भूमिका मोलाची असणार आहे.