मुंबई : विराट कोहली क्रिकेटच्या मैदानात रोज नवीन रेकॉर्ड करत आहे. आता क्रिकेटच्या मैदानाबाहेरही विराटने दिग्गजांना मागे टाकलं आहे. 'भारतीय सेलिब्रिटी ब्रॅण्ड व्हॅल्यू'मध्ये विराट अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या पुढे आहे.
ग्लोबल एडव्हायजरी फर्म डफ ऍण्ड फेल्प्सने नुकताच 'भारतीय सेलिब्रिटी ब्रॅण्ड व्हॅल्यू' चा एक रिपोर्ट दिला. या रिपोर्टनुसार विराटची ब्रॅण्ड व्हॅल्यू लागोपाठ तिसऱ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहे.
२०१९ या वर्षात विराटची ब्रॅण्ड व्हॅल्यू २३.७५ कोटी अमेरिकन डॉलर एवढी झाली आहे. विराटच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूमध्ये जवळपास ३९ टक्क्यांची वाढ झाली आहे. विराट कोहली एमएस धोनी, सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा या क्रिकेटपटूंपेक्षा बराच पुढे आहे.
अक्षय कुमार या यादीत १०.४५ कोटी अमेरिकन डॉलर ब्रॅण्ड व्हॅल्यूसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दीपिका पदुकोण तिसऱ्या, रणवीर सिंग चौथ्या, शाहरुख खान पाचव्या, सलमान खान सहाव्या, आलिया भट सातव्या आणि अमिताभ बच्चन नवव्या क्रमांकावर आहेत.
भारतीय सेलिब्रिटी ब्रॅण्ड व्हॅल्यूच्या टॉप-२० मध्ये ४ क्रिकेटपटू आहेत. यामध्ये कोहलीशिवाय एमएस धोनी ४.१२ कोटी अमेरिकन डॉलरसह नवव्या क्रमांकावर, सचिन तेंडुलकर १५व्या आणि रोहित शर्मा २०व्या क्रमांकावर आहे.
सेलिब्रिटी ब्रॅण्ड व्हॅल्यू टॉप-१०
विराट कोहली
अक्षय कुमार
दीपिका पदुकोण
रणवीर सिंग
शाहरुख खान
सलमान खान
आलिया भट
अमिताभ बच्चन
महेंद्रसिंग धोनी
आयुषमान खुराना