लंडन : वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये अंपायरनी ओव्हर थ्रोच्या दिलेल्या ४ रनवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादावर आता खुद्द बेन स्टोक्सने मोठा खुलासा केला आहे. इंग्लंडच्या टेस्ट टीमचा सदस्य जेम्स अंडरसन याने याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
बेन स्टोक्सच्या बॅटला मार्टिन गप्टीलने थ्रो केलेला बॉल लागला आणि बॉल बाऊंड्रीच्या दिशेने गेला. यानंतर बेन स्टोक्सने माफी मागितली आणि अंपायरना ओव्हर थ्रोच्या ४ रन देऊ नका. आम्हाला या रन नको आहेत, असं सांगितल्याचं जेम्स अंडरसन म्हणाला आहे.
'या नियमाबद्दल याआधीही बरच बोललं गेलं आहे. रन काढत असताना बॅट्समनला बॉल लागून बाऊंड्रीच्या बाहेर गेला, तर डेड बॉल देण्यात यावा, अशी मागणी बऱ्याच कालावधीपासून होत आहे. अशाप्रकारे बॅट्समनला बॉल लागून बाऊंड्रीपर्यंत गेला नाही, तर बॅट्समन रन काढत नाहीत. हा शिष्टाचार बॅट्समन पाळतात, पण बॉल बाऊंड्रीबाहेर गेला तर मात्र खेळाडू काही करू शकत नाही. नियमानुसार अंपायरला फोर द्यावी लागते,' अशी प्रतिक्रिया अंडरसनने दिली.
इंग्लंडला शेवटच्या ३ बॉलमध्ये विजयासाठी ९ रनची गरज होती. यावेळी स्टोक्सने दोन रन घ्यायचा प्रयत्न केला. दुसरी रन काढताना न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीलने केलेला थ्रो स्टोक्सच्या बॅटला लागला आणि फोर गेली. यानंतर अंपायर कुमार धर्मसेना यांनी ६ रन दिल्या.
या परिस्थितीमध्ये अंपायरनी स्टोक्सची पहिली रन आणि ओव्हर थ्रोच्या ४ रन अशा एकूण ५ रन देणं आवश्यक होतं. तसंच दुसरी रन पूर्ण न झाल्यामुळे बेन स्टोक्स नॉन स्ट्रायकर एन्डला जाणं अपेक्षित होतं.
- आयसीसीच्या १९.८ नियमानुसार जर ओव्हर थ्रोमुळे बॉल बाऊंड्रीवर जात असेल तर त्यामध्ये बॅट्समनने पूर्ण केलेल्या रन जोडल्या जातात.
- जर बॅट्समननी थ्रो करायच्या आधी एकमेकांना क्रॉस केलं तर ओव्हर थ्रोमध्ये त्या रनही जोडल्या जातील.
- जर फिल्डरने थ्रो फेकायच्या आधी बॅट्समननी एकमेकांना क्रॉस केलं नसेल, तर ती रन जोडली जाणार नाही.
मार्टिन गप्टीलने जेव्हा थ्रो केला तेव्हा बेन स्टोक्स आणि आदिल रशीद यांनी दुसऱ्या रनसाठी एकमेकांना क्रॉस केलं नव्हतं. तरीही अंपायरनी इंग्लंडला २ रन आणि ओव्हर थ्रोच्या ४ रन अशा एकूण ६ रन दिल्या.
कुमार धर्मसेना आणि मरे एरॅसमस यांनी एमसीसीच्या या नियमाप्रमाणे निर्णय घेतला असता तर इंग्लंडला विजयासाठी २ बॉलमध्ये ४ रनची गरज असती, तसंच बेन स्टोक्स नॉन स्ट्रायकर एन्डला गेला असता. पण अंपायरच्या चुकीच्या निर्णयामुळे स्टोक्स स्ट्राईकवर आला आणि इंग्लंडचं आव्हान २ बॉलमध्ये ३ रन एवढं झालं.