Shahid Afridi On Babar Azam: वर्ल्ड कप 2023 च्या 32 व्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडवर मोठा विजय मिळवला आहे. 190 धावांनी मिळवलेल्या या विजयासहीत दक्षिण आफ्रिकेने सेमीफायनल्समध्ये आपलं स्थान जवळपास निश्चित केलं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयामुळे पाकिस्तानच्या सेमीफायनल्समध्ये प्रवेश करण्याची शक्यता वाढली आहे. असं असलं तरी पाकिस्तानचा प्रमुख फलंदाज असलेला कर्णधार बाबर आझम सध्या चांगली फलंदाजी करत नसल्याची चिंता पाकिस्तानी चाहत्यांबरोबरच माजी खेळाडूंनाही सतावत आहे. हीच चिंता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान बोलून दाखवली आहे. शाहीद आफ्रिदीने थेट विराट कोहली आणि के. एल. राहुलशी बाबरची तुलना करताना दोन्ही भारतीय फलंदाज बाबरपेक्षा सरस कसे आहेत हे सांगताना बाबरला आरसा दाखवण्याच काम केलं आहे.
204 धावांच्या माफक लक्षाचा पाठलाग करताना बाबर आझम पुन्हा अपयशी ठरला. बाबरला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 16 बॉलमध्ये केवळ 9 धावा करता आल्या. मेहंदी हसनच्या गोलंदाजीवर तो मेहमदुल्लाकडे झेल देऊन तंबूत परतला. बाबरला वर्ल्ड कप 2023 3 अर्धशतकं झळकावता आली असली तरी तिन्ही अर्धशतकं संघाच्या कामी आली नाहीत. भारत, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात बाबरने अर्धशतकं झळकावली पण ही फारच संथ गतीने केल्याने त्यांचा फारसा फायदा संघाला झाला नाही. याच मुद्द्यावरुन शाहीद आफ्रिदीने बाबरची अगदी लाजच काढली आहे.
एका चर्चासत्रामध्ये आफ्रिदीने बाबर हा सामना जिंकवून देणारा खेळाडू वाटत नाही, असं म्हटलं आहे. हे विधान करताना आफ्रिदीने विराट आणि के. एल. राहुलचा उल्लेख केला आहे. बाबर हा विराट आणि के. एल. राहुलसारखा सामना जिंकवून देणारा मॅच विनर खेळाडू नाही असं आफ्रिदीने म्हटलं आहे. "बाबर आझमने धावा करणं वेगळी गोष्ट आहे आणि त्याने केलेल्या धावांमुळे पाकिस्तानने सामना जिंकणं वेगळी गोष्ट आहे. के. एल. राहुल आणि विराट कोहली काय करतात? ते स्वत: धावा करतात आणि संघालाही जिंकून देतात. विराट कोहली आणि के. एल. राहुलप्रमाणे तो खेळत नाही," असं शाहीद आफ्रिदी म्हणाला.
"आपण सगळे म्हणतो की बाबर फार मोठा खेळाडू आहे. तर मोठा खेळाडू असल्यावर त्याने त्याच्या कामगिरीमध्ये सातत्य ठेवणंही महत्त्वाचं असतं. बाबर आझम मैदानावर उतरणार असेल तर तो सामना जिंकवून येईल असं वाटलं पाहिजे. मात्र बाबर आता मैदानात उतरतो तेव्हा असं वाटत नाही. बाबर मैदानात उतरुन 50-60 धावा करेल असं वाटतं पण तो सामना जिंकवून देईल असं वाटत नाही. आपल्याला असा खेळाडू हवा आहे जो मैदानात उतरल्यावर सामना जिंकून देईल," असं मत शाहीद आफ्रिदीने व्यक्त केलं.
बाबरने वर्ल्ड कपमधील पाकिस्तानच्या पहिल्या 7 सामन्यांमध्ये एकूण 216 धावा केल्या आहेत. यावरुनच त्याची कामगिरी किती सुमार आहे याचा अंदाज बांधता येतो. विशेष म्हणजे बाबर हा आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेटच्या क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे.