World Cup 2023 : मुंबई, दिल्ली या देशातील 2 प्रमुख शहरातील हवेची गुणवत्ता खूपच खालवली आहे. यामुळे नागरिकांना विविध आजार जडले आहेत. त्यात वर्ल्डकपचे सामने मुंबई पाठोपाठ दिल्लीच्या मैदानावर होत आहे. धुके आणि प्रदूषणाचा परिणाम विश्वचषक क्रिकेट मालिकांवर होतोय. श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात 6 नोव्हेंबरला दिल्लीत सामना होणार आहे. या काळात हवामानाची स्थिती चांगली नाही. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
3 डिसेंबर 2017 रोजी फिरोजशाह कोटला स्टेडियमवर (आताचे अरुण जेटली स्टेडियम) भारत-श्रीलंका सामना होता. त्या दिवशी दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स 351 होता. त्यामुळे श्रीलंकेच्या खेळाडूंना मास्क घालणे आवश्यक होते. 6 नोव्हेंबरला होणारा सामनाही श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात आहे. हा सामना दुपारी 2 वाजता सुरू होणार असून रात्री उशिरापर्यंत चालणार आहे. प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम सकाळ-संध्याकाळच्या वेळीच दिसून येतो.
दिल्लीमध्ये 6 ते 11 नोव्हेंबर दरम्यान प्रदूषण पातळी अत्यंत वाईट आणि गंभीर पातळीवर राहू शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविली आहे. 2017 च्या सामन्यावेळीदेखील अशाच प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळाडू मास्क घालून खेळताना दिसले होते.
सध्याची प्रदूषणाची परिस्थिती पाहता विविध मार्गाने काळजी घेतली जात आहे. यावेळी मॅचदरम्यान फटाके वाजविण्यावर बंदी घातली जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) याबाबत आश्वासन दिले आहे. दिल्लीतील प्रदूषणाची परिस्थिती पाहता सामन्यादरम्यान फटाके वाजवले जाणार नसल्याचा सांगण्यात आले आहे.
स्टेडियमजवळील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सामन्यादरम्यान गट 3 चे निर्बंध लागू आहेत. कार्यक्रमस्थळी अनेक पथके तैनात करण्यात आली असून हे पथक उघड्यावर जाळणे आणि प्रदूषण वाढवणाऱ्या इतर कारणांवर लक्ष ठेवणार आहेत. रस्त्यावरील धूळ कमी करण्यासाठी फवारणीसह धूळ शमनकांचा वापर केला जात आहे. लोकांना मेट्रो आणि बसने कार्यक्रमस्थळी येण्याचा सल्ला देण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात निर्देश दिले आहेत.