मुंबई : जगातील पहिल्या स्थानावर असलेल्या महिला टेनिस खेळाडूनं वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे क्रीडा विश्वात सर्वांना खूप मोठा धक्का बसला.
ऑस्ट्रेलियाची टेनिस प्लेअर एश्ले बार्टी (Ash Barty) हिने आपण संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं. तिने इन्स्टाग्रामवर याबाबत एक पोस्ट घेतली आहे. तिचा हा निर्णय सर्वांनाच धक्का देणारा ठरला आहे. बार्टीने आपल्या करिअरमध्ये 3 ग्रॅण्ड स्लॅम (सिंगल) मिळवले आहेत.
नुकतंच तिने यंदाच्या ऑस्ट्रेलिया ओपनमधील ग्रॅण्ड स्लॅमवर आपलं नाव कोरलं. तिच्या या विजयाचं कौतुक जगभरात सुरू असताना तिने हा धक्कादायक निर्णय का घेतला असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
बार्टीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये ती म्हणते, 'मी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. मला वाटतं हा निर्णय घेण्याची ही योग्य वेळ आहे. मला टेनिसने बरंच काही दिलं. मी शारीरिक आणि मानसिकदृष्टा अजून यापुढे उत्तम खेळू शकते असं मला वाटत नाही. त्यामुळे मी हा निर्णय घेतला.'
'मी माझ्या निर्णयामुळे आनंदात आहे. यासाठी मी आधीपासून तयार होते. मी टेनिसमधून संन्यास घेत असल्याची घोषणा करते. हा दिवस माझ्यासाठी खूप कठीण आणि भावनांनी भरलेला आहे. मला समजत नव्हतं मी तुमच्यासोबत हे सगळं कसं शेअर करू.'
'मला माझ्या खास मैत्रिणीने केसी डेलाकुआने यासाठी खूप मोठी मदत केली. आजवर तुम्ही दिलेलं प्रेम आणि पाठिंब्यासाठी मी कायम तुमची ऋणी आहे. बाकी गोष्टी मी पत्रकार परिषद घेऊन सांगेन' असंही एश्लेनं यावेळी म्हटलं आहे.
एश्ले बार्टी महिला सिंगल टेनिसमधील जागतिक क्रमावरीत अव्वल महिला खेळाडू आहे. गेल्या 114 आठवड्यांपासून नंबर-1 वर आहे. पुढच्या महिन्यात 24 एप्रिलला तिचा वाढदिवस आहे. मात्र त्याआधीच वयाच्या 25 व्या वर्षी तिने टेनिसमधून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं आहे.