WTC Final 2023 : नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. पहिल्या दिवसापासून आघाडीवर असणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघानं हा खेळ पाचव्या दिवसापर्यंत आणला खरा, पण या दिवशीही सामन्यावर त्यांचच अधिपत्य पाहायला मिळालं. सरतेशेवटी पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रापर्यंत आलेला हा सामना कांगारुंनीच खिशात टाकला. सलग दुसऱ्यांदा WTC च्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला आणि अनेक क्रिकेटप्रेमींची निराशा झाली.
Team India च्या गोलंदाजांना या सामन्यात पहिल्या दिवसापासूनच सूर गवसला नसताना क्रिकेटप्रेमींची निराशा तर झालीच. तर, बीसीसीआयनंही थेट शब्दांमध्ये भारतीय संघाच्या किमगिरीवर बोचरी टीका केली. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी असणाऱ्या माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया देत काही गोष्टी स्पष्ट केल्या. (WTC Final 2023 IND vs AUS bcci president roger binnys statment post defeat went viral )
BCCI चे अध्यक्ष यांनी संघाच्या पराभवावर निराशा व्यक्त करत म्हटलं, 'मला वाटतं पाचव्या दिवशी फारच उशीर झाला होता. आपण (भारतीय संघानं) पहिल्याच दिवशी सामना गमालला होता जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी 200 हून अधिक धावांचा डोंगर रचला'. बिन्नी यांनी ही प्रतिक्रिया देताना त्यांचा गंभीर सूर सर्वकाही सांगून गेला. सोबतच त्यांनी भविष्यातील क्रिकेट मालिका आणि भारतातच आगामी विश्वचषक पाहता तिथं तरी संघानं चांगलं प्रदर्शन करावं, किंबहुना तशी गरजच आहे असंही स्पष्ट केलं.
#WATCH | ICC World Test Championship Final | In London, BCCI president Roger Binny says, "...We lost the game on the first day itself. The big partnership that Australia put on was what really turned the tables in this game. Otherwise, the game was even. If you take away that… pic.twitter.com/EmCtbAIx7H
— ANI (@ANI) June 11, 2023
London च्या ओव्हल मैदानात खेळवल्या गेलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघानं नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. इथूनच गणित चुकल्याचं पाहायला मिळालं. ऑस्ट्रेलियाच्या वतीनं पहिल्या डावात ट्रेविस हेड(163) आणि स्टीव स्मिथ(121) यांच्या शतकी खेळीच्या बळावर संधानं 469 धावांचा डोंगर रचला. इथं भारताकडून शार्दुल ठाकुर(51), अजिंक्य रहाणे(89), रवींद्र जडेजा(48) या खेळाडूंच्या धावसंख्येमुळं संघ 296 धावा करू शकला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियानं 270 धावा करत डाव घोषित केला आणि भारतापुढे विजयासाठी तब्बल 444 धावांचं लक्ष्य ठेवलं. हे आव्हान झेलताना संघ काहीसा नव्हे तर पुरता कोलमडला आणि 234 धावांवर गारद झाला. परिणामी हा किताब ऑस्ट्रेलियाच्याच खात्यात गेला.