मुंबई : इंग्लंड दौऱ्यासाठी अंबाती रायडूची निवड करण्यात आली होती. पण यो-यो टेस्टमध्ये फेल झाल्यामुळे रायडू इंग्लंड दौऱ्याला मुकला. यानंतर पुन्हा यो-यो टेस्टबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले. यो-यो टेस्टवरून बीसीसीआय, खेळाडू आणि माजी क्रिकेटपटूंमध्ये मतमतांतरं आहेत. भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय टीममध्ये निवड होण्यासाठी यो-यो टेस्ट बंधनकारक केली आहे. पण सचिन तेंडुलकरनं यो-यो टेस्टबद्दल त्याचं मत व्यक्त केलं आहे.
हिंदुस्तान टाईम्सला सचिन तेंडुलकरनं मुलाखत दिली. टीममध्ये निवड होण्यासाठी फक्त यो-यो टेस्ट हाच आधार नसावा. फिटनेस हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण खेळाडूंचा फिटनेसचा मापदंड वेगवेगळे असू शकतात, असं सचिन तेंडुलकर म्हणाला. मी कधीच यो-यो टेस्ट पास केली नाही. आमच्यावेळी बीप टेस्ट होती. खेळाडूंची खेळाची क्षमता आणि तो स्वत:ला कसं फिट ठेवतो, हे पाहणं महत्त्वाचं असल्याची प्रतिक्रिया सचिननं दिली.
यो-यो टेस्टवर टीका झाल्यानंतरही विराट कोहली आणि रवी शास्त्री त्यांच्या मतावर ठाम आहेत. यो-यो टेस्ट पास करा आणि भारतासाठी खेळा असा फर्मान कोहली-शास्त्रीनं काढला आहे. आम्ही घेतलेला हा कठोर निर्णय आहे. याचा टीमला फायदा होईल, असं कोहली म्हणाला होता.
यो-यो टेस्टमध्ये अयशस्वी झाल्यामुळे युवराज सिंग, सुरेश रैना आणि अंबाती रायडूला वेगवेगळ्या वेळी भारतीय टीमकडून खेळता आलं नाही. यो-यो टेस्टमध्य पास न झाल्यामुळेच फास्ट बॉलर मोहम्मद शमीला अफगाणिस्तानविरुद्धची टेस्ट खेळता आली नव्हती.