Steve Jobs Cheque Auction: अॅपल कंपनीच्या (Apple Inc.) आयफोनची (iPhone) क्रेझ दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. भारतामध्ये अॅपलने मागील महिन्यातच पहिलं अधिकृत स्टोअर सुरु केलं. तशी अॅपलची जगभरातील लोकप्रियता ही स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs) यांच्या कार्यकाळापासूनच आहे. खरं तर स्टीव्ह जॉब्स यांचीच लोकप्रियता एवढी आहे की विचारता सोय नाही. यायच प्रयत्य पुन्हा एकदा आला जेव्हा नुकताच स्टीव्ह जॉब्स यांनी स्वाक्षरी केलेल्या एका चेकचा लिलाव झाला. खरं तर लिलावामध्ये एखादी वस्तू, नाणी, मूर्ती किंवा त्या व्यक्तीने वापरलेल्या वस्तूंचा समावेश असतो. पण स्टीव्ह जॉब्स यांची स्वाक्षरी असलेल्या एका चेकचाच लिलाव करण्यात आला. आश्चर्याची बाब म्हणजे अॅपलचे सहसंस्थापक असलेल्या स्टीव्ह जॉब्स यांची स्वाक्षरी असलेला हा चेक तब्बल 1 लाख 6 हजार 985 अमेरिकी डॉलर्सला विकला गेला. भारतीय चलनानुसार ही किंमत 87 लाख 94 हजार म्हणजेच जवळजवळ 88 लाख रुपये इतकी होते. मात्र या चेकला एवढी किंमत मिळण्यामागे एक विशेष कारण आहे.
अॅपलचे स्टीव्ह जॉब्स हे आजही टेक विझार्ड म्हणजेच तंत्रज्ञान क्षेत्रातील जादूगार म्हणून ओळखले जातात. अॅपल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांनी स्वाक्षरी केलेला एक चेक 1 लाख डॉलर्सहून अधिक किंमतीला विकला गेला आहे. हा चेक 1976 सालातील आहे. मॅकरुमर्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. आरआर ऑक्शन या कंपनीने जॉब्स यांची स्वाक्षरी असलेल्या या चेकचा लिलाव आयोजित केला होता. मजल दरमजल करत या चेकसाठी तब्बल 1 लाख अमेरिकी डॉलर्सहून अधिकची बोली लागली. हा चेक जॉब्स यांनी 1976 साली क्रॅप्टन, रेमेक, मिलर, आयएनसीच्या नावे दिला होता. मात्र या चेकला एवढी किंमत मिळण्यामागील कारण असं की हा चेक 1976 साली देण्यात आलेला आणि याच वर्षी अॅपल कंपनीची स्थापना झाली होती. 1 एप्रिल 1976 साली अॅपल कम्प्युटर आयएनसी नावाने ही कंपनी सुरु करण्यात आळी होती.
हा चेक विशेष असण्याचं दुसरं कारण म्हणजे या चेकवर छापलेला पत्ता. या चेकवर 770 व्लेच रोड, स्ट्रीट 154 पालो अल्टो असा पत्ता लिहिलेला असून हा अॅपल कंपनीचा पहिला अधिकृत पत्ता आहे. हा चेक केवळ 175 डॉलर्सचा आहे. म्हणजेच आजच्या दरानुसार या चेकची किंमत 14 हजार रुपये इतकी आहे. हा चेक 8 जुलै 1976 साली स्टीव्ह जॉब्स यांनी साइन केलेला. मात्र स्टीव्ह जॉब्स यांनी स्वाक्षरी केलेला चेक विकला गेल्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वी 2022 रोजी स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वॉझनिक यांनी स्वाक्षरी केलेला एक चेक 1 लाख 64 हजार डॉलर्सला (1 कोटी 34 लाख रुपयांना) विकला गेला होता.
(Photo Credit: Macrumors)
स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वॉझनिक यांनी एकत्र येऊन ही कंपनी सुरु केली होती.